कळंब बायपासवर वाहतूक पोलिसाला ट्रकने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 10:07 PM2018-04-03T22:07:33+5:302018-04-03T22:07:33+5:30
भरधाव ट्रकने चिरडल्याने वाहतूक पोलीस जागीच ठार झाल्याची घटना येथील कळंब बायपासवर मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भरधाव ट्रकने चिरडल्याने वाहतूक पोलीस जागीच ठार झाल्याची घटना येथील कळंब बायपासवर मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. तपासणीसाठी ट्रक न थांबल्याने त्याचा पाठलाग करताना दुचाकी ट्रकखाली आली.
सय्यद करीमोद्दीन सय्यद बद्रुद्दीन उर्फ बब्बू (५२) रा. कोहीनूर सोसायटी भोसा असे मृत पोलिसाचे नाव आहे. ते जिल्हा वाहतूक शाखेत जमादार पदावर कार्यरत होते. ते मंगळवारी सकाळी कळंब बायपासवर कर्तव्य बजावित होते. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास नागपूरकडून आयशर ट्रक (क्र.एम.एच.४०-५६९९) कळंब बायपासवर आला. करीमोद्दीन यांनी या ट्रकला थांबविण्यासाठी इशारा केला. मात्र हा ट्रक भरधाव धामणगाव मार्गाकडे निघाला. त्याला थांबविण्यासाठी करीमोद्दीन यांनी आपल्या दुचाकीने पाठलाग केला. पाठलाग करताना ट्रकच्या बफ्फरमध्ये दुचाकी अडकली आणि करीमोद्दीन ट्रकच्या चाकाखाली आले. त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर स्वरूपाचा मार लागून जागीच मृत्यू झाला.
अपघाताचे दृश्य दिसताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पळून जाणाºया ट्रक चालकाला पकडून चांगलाच चोप दिला. म.जमील शेख आरीफ (३४) रा. यशोदानगर नागपूर असे चालकाचे नाव आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करणाºया वाहतूक पोलिसाचाच अपघाती मृत्यू झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. सय्यद करीमोद्दीन यांचे पार्थिव पोलीस मुख्यालयात आणण्यात आले. तेथे पोलिसांनी मानवंदना दिली.