धोकादायक पुलावरून वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 09:54 PM2019-08-04T21:54:55+5:302019-08-04T21:55:15+5:30

तालुक्यातील विविध रस्त्यांवर असलेल्या नदी-नाल्यांना ओलांडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल बांधले आहे. मात्र त्यामधील काही पूल धोकादायक असूनही त्यावरून वाहतुकीची वर्दळ सुरू आहे. त्यामध्ये पाटाळा, शिरपूर, पेटूर गावाजवळील पूल जीवघेणे ठरत आहेत.

Transportation by dangerous bridge | धोकादायक पुलावरून वाहतूक

धोकादायक पुलावरून वाहतूक

Next
ठळक मुद्देअनेकांचे गेले प्राण : डागडुजीवरच निभावले जात आहे काम

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : तालुक्यातील विविध रस्त्यांवर असलेल्या नदी-नाल्यांना ओलांडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल बांधले आहे. मात्र त्यामधील काही पूल धोकादायक असूनही त्यावरून वाहतुकीची वर्दळ सुरू आहे. त्यामध्ये पाटाळा, शिरपूर, पेटूर गावाजवळील पूल जीवघेणे ठरत आहेत.
वणी-नागपूर या राज्य मार्गावर पाटाळा गावाजवळ वर्धा नदीवर असलेला पुल सर्वात धोकादायक ठरत आहे. वणीला चंद्रपूर, वर्धा, नागपूर जिल्ह्यांना जोडणारा हा मार्ग असल्याने सर्वाधिक रहदारीचा मार्ग आहे. या मार्गावर पाटाळा गावाजवळ वर्धा नदीवर पुल तयार केला. या पुलाला ५० वर्षापेक्षा अधिक काळ झाला. बांधतानाच हा पुल अरूंद व अतिशय ठेंगणा बांधण्यात आला. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात किमान चार-पाचवेळा तरी पुराचे पाणी या पुलावरून वाहते. पाण्याच्या वेगवान प्रवाहाने दरवर्षीच या पुलावर खड्डे पडतात. पुल अरूंद असल्याने दोन वाहनांना एकमेकांना ओलांडताना सावधगरीनेच ओलांडावे लागते. पुलावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहन पुलावरून काढणे तारेवरची कसरत ठरते. वारंवार पुर गेल्याने हा पुल कमकुवतसुद्धा झाला आहे. विशेष म्हणजे पुलावरून नेहमी पुराचे पाणी जात असल्याने पुलाच्या कडेला कठडे लावले जात नाही. त्यामुळे वाहनचालकांचे लक्ष जराशेही विचलीत झाल्यास आडकाठी नसल्याने वाहन सरळ नदीत पडू शकते. आतापर्यंत अनेक दोनचाकी व चारचाकी वाहने पुलावरून नदीत पडून अनेकांचे जीव गेले आहेत. मात्र बांधकाम विभागाला याचे गांभीर्य दिसून येत नाही. पुलावरील खड्डे बुजविण्याचे व त्याला कठडे लावण्याचे काम तात्काळ केले जात नाही. आता करंजी-ब्रम्हपुरी हा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला आहे. लवकरच त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी शेतीचे भूसंपादन करण्यात आले आहे. तयार होणाऱ्या चौपदरी रस्त्याला साजेसा असा रूंद व पुरेशा उंचीचा पुल याठिकाणी तयार होणार काय, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. वणी-कोरपना मार्गावरील शिरपूर गावाजवळ निर्गुडा नदीवर असलेला पुलही कमकुवत व धोकादायक झाल्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या पुलाच्या दोन्ही बाजुस लावली आहे. नुकतीच या पुलाची डागडुजी करण्यात आली आहे. या पुलावरून सिमेंट व कोळसा वाहतूक करणाºया अवजड ट्रकची सतत वाहतूक सुरू असते. त्यामुळे एखादेवेळी मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही वर्षापूर्वी हा पुलसुद्धा नदीच्या पुरात वाहून गेला होता. त्याची पुनरावृत्ती होण्याचीही शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. वणी-मुकूटबन मार्गावर पेटूर गावाजवळ नाल्यावर असलेला पुल तर पावसाळ्यात नेहमीच वाहतुकीला अडथळा ठरत आहे. या पुलाची उंची अतिशय कमी असल्याने साधारण पावसानेही नाल्याचे पाणी या पुलावरून वाहते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबून राहते. मागीलवर्षी याच पुलावरून एक युवक पुरात वाहून गेला. या पुलाची उंची वाढविण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Transportation by dangerous bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.