जमादार, लिपीक व भाजी विक्रेत्यावर ‘ट्रॅप’
By admin | Published: December 31, 2015 02:43 AM2015-12-31T02:43:20+5:302015-12-31T02:43:20+5:30
यवतमाळ पाटबंधारे विभागातील लिपीक आणि पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याचा जमादार व त्याच्या सहकारी भाजी विक्रेत्याला लाचलुचपत विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
‘एसीबी’ची कारवाई : पुसद, यवतमाळात अटक
यवतमाळ/पुसद : यवतमाळ पाटबंधारे विभागातील लिपीक आणि पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याचा जमादार व त्याच्या सहकारी भाजी विक्रेत्याला लाचलुचपत विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी यवतमाळ व पुसद येथे करण्यात आली.
यवतमाळ पाटबंधारे विभागातील दफ्तर कारकून अजय देवीदासराव देशमुख याला ५०० रुपयांची स्वीकारताना पकडण्यात आले. शेतासाठी वर्धा नदीतून पाणी घेण्यासाठी दीर्घ मुदतीचा करारनामा अर्ज वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी त्याने शेतकऱ्याला लाच मागितली होती. पाटबंधारे कार्यालयासमोरील रस्त्यावर लाच स्वीकारताना त्याला पकडण्यात आले. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख, सहकारी अरुण गिरी, अमीत जोशी, अमोल महल्ले, शैलेश ढोणे, अनिल राजकुमार, नीलेश पखाले, किरण खेडकर, सुधाकर मेश्राम यांनी पार पाडली.
अटक टाळून परस्पर जामीन मिळवून देण्याचे सांगून पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याचे जमादार मनोहर हिरासिंग जाधव याने भाजी विक्रेता वसंता राठोड याच्यामार्फत संबंधिताला नऊ हजार रुपयांची लाच मागितली. यानुसार श्रीरामपूर भागातील विद्युत भवन हे स्थळ लाच देण्यासाठी निश्चित करण्यात आले. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जमादार जाधव व भाजी विक्रेत्याला लाच स्वीकारताना पकडले. (लोकमत न्यूज नेटवर्क)