पांढरकवडातून तेलंगणात सागवान तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 09:54 PM2019-04-14T21:54:30+5:302019-04-14T21:54:51+5:30
तालुक्यातील मौल्यवान सागवान तसेच इतर वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत असून शेजारच्या तेलंगणा राज्यात या सागवानाची तस्करी केली जात आहे. याकडे मात्र वनविभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : तालुक्यातील मौल्यवान सागवान तसेच इतर वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत असून शेजारच्या तेलंगणा राज्यात या सागवानाची तस्करी केली जात आहे. याकडे मात्र वनविभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
पांढरकवडा तालुका हा चारही बाजूंनी जंगलाने व्यापलेला असून तालुक्यात विपुल वनसंपत्ती आहे. याच तालुक्यात टिपेश्वर अभयारण्यसुद्धा आहे. या जंगलात सागवानासह विविध मौल्यवान वृक्ष आहेत. तेलंगणाच्या सिमेपासूनच काही अंतरावर पांढरकवडा तालुक्यात चारही बाजूंनी जंगलाचा परिसर आहे. तेलंगणाच्या तस्करांचा या वनसंपदेवर डोळा असून या तस्करीला स्थानिकांचा हातभार लागत आहे. तेलंगणातील तस्कर स्थानिकांच्या मदतीने रात्रीच्यावेळी मोठमोठ्या सागवान वृक्षांची कत्तल करतात व रातोरात तेलंगणा राज्यात वाहनाद्वारे हे मौल्यवान लाकुड सिमापार करतात. वाहन सीमापार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण होते. अनेक तस्करांजवळ स्वयंचलित आरामशीन असून या मशीनद्वारे अवघ्या काही मिनीटातच सागवानाचे मोठे झाडही कापल्या जाते. या सागवानाचे तुकडे करून वाहनात भरून त्यावर गौण खनिज अथवा वैरण किंवा बारदाणा टाकतात. त्यानंतर ते तेलंगणा राज्यात नेले जाते. मध्यंतरी काही सागवान तस्करांना पकडण्यातही आले होते. त्यांच्याकडून सागवान मालही जप्त करण्यात आला होता. परंतु नंतर या प्रकरणाचे काय झाले, याबाबत काहीही समजले नाही. अनेकदा हे सागवान तस्कर सागवान तोडीच्या नावाखाली वन्यप्राण्यांची शिकारदेखिल करतात.
जंगलात कुणीही फेरफटका मारला असता, सागवान झाडांची कत्तल झाल्याचे दिसून येते. सागवानाची तुटलेली थुटेही दृष्टीस पडतात. परंतु वनविभागाला ही वृक्षतोड दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सर्रास सुरू आहे. परंतु याकडे वनविभाग लक्ष द्यायला तयार नाही. वृक्षप्रेमी, वन्यप्रेमी म्हणून स्वत:चा उदोउदो करून घेणारेही या वृक्षतोडीबाबत चुप्पी साधून आहे. केवळ वृक्षारोपणाच्या नावाखाली प्रसिद्धी मिळविणाऱ्या या स्वयंघोषित वृक्षप्रेमींनी व वन्यप्रेमींनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
वनउपज तपासणी नाके उरले केवळ नावापुरतेच
सागवान तस्करीला आळा बसावा म्हणून वनविभागाने ठिकठिकाणी वनउपज तपासणी नाके उभारले आहेत. परंतु हे नाके केवळ शोभेसाठीच बनले की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. काही अपवाद जर सोडला, तर या नाक्यावर रात्रीच्यावेळी एकही कर्मचारी दिसत नाही. याच संधीचा लाभ हे सागवान तस्कर घेत आहे. एकीकडे शासन वृक्ष लागवडीसाठी विविध योजना अंमलात आणत आहे, तर दुसरीकडे सागवान तस्कर अवैधरितीने मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करीत आहे. या वृक्षतोडीमुळे मात्र वनसंपदा नष्ट होत आहे.