ट्रॉमा केअर सेंटर धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:48 PM2019-02-20T23:48:36+5:302019-02-20T23:49:14+5:30
अपघातग्रस्त आणि आकस्मिक सेवेसाठी येथे मंजूर झालेले ट्रॉमा केअर सेंटर अद्याप सुरू झाले नाही. कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेली वास्तू गेल्या दोन वर्षांपासून धूळ खात पडून आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : अपघातग्रस्त आणि आकस्मिक सेवेसाठी येथे मंजूर झालेले ट्रॉमा केअर सेंटर अद्याप सुरू झाले नाही. कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेली वास्तू गेल्या दोन वर्षांपासून धूळ खात पडून आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
मार्च २०१७ मध्ये येथे दोन कोटी कोटी ६७ लाख रुपये खर्च करून ट्रॉमा केअर सेंटरची इमारत बांधण्यात आली. परंतु बांधकामातील त्रुटींमुळे इमारतीचे हस्तांतरण करून घेण्यात आले नाही. या सेंटरसाठी सर्वात महत्त्वाचे असलेले आॅर्थोतज्ज्ञाचे पद रिक्त आहे. त्यामुळे हे सेंटर सुरू होईल की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. आकस्मिक सेवा तसेच अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळावे, याकरिता उपजिल्हा रुग्णालय परिसरात ट्रॉमा केअर सेंटरला १७ जानेवारी २०१३ रोजी प्रशासकीय मंजुरी मिळाली होती.
निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २४ फेब्रुवारी २०१५ रोजी बांधकाम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर दोन कोटी ६७ लाख रुपये खर्च करून २0 हजार चौरस फुटावर इमारत बांधण्यात आली. मात्र ४१ खोल्या आणि दोन शस्त्रक्रियागृह असलेल्या या इमारतीमध्ये मोठी त्रुटी राहिली. सर्व खोल्यांमध्ये पाच फुटापर्यंत व शस्त्रक्रिया गृहात संपूर्ण भिंतीवर टाइल्स लावलीच नाही. तसेच पाण्याचे नियोजन करण्यात आले नसल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्रव्यवहार करूनसुद्धा उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने ही वास्तू अद्याप हस्तांतरित करून घेतली नाही.
या सेंटरच्या पदभरतीचाही प्रश्न कायम आहे. एक आॅर्थोतज्ज्ञ, चार डॉक्टर, दोन भूलतज्ज्ञ व स्टाफ नर्स आदींची आवश्यकता आहे. यापैकी चार डॉक्टर आणि दोन स्टाफ नर्सची पदे भरली. आॅर्थोतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ यांची पदे रिक्त आहे. येथे आॅर्थोतज्ज्ञ मिळणे मुश्किल असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून सांगितले जाते. त्यामुळे येथील ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यात अडचण निर्माण झाली आहे.
बांधकामातील त्रुटी दूर करून वास्तूचे हस्तांतरण व आवश्यक पदभरती, यावरच ट्रॉमा केअर सेंटरचे भवितव्य अवलंबून आहे.
त्रुटींवर नऊ लाख खर्च
ट्रॉमा केअर सेंटर वास्तूच्या बांधकामात राहिलेली त्रुटी पूर्ण करण्याकरिता नऊ लाखांचा खर्च येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने इस्टिमेट तयार करून मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठविले. त्याला मंजुरीची प्रतीक्षा असून नंतरच वास्तूत टाइल्स बसविण्यात येईल. ही त्रुटी पूर्ण झाल्यावरच वास्तू हस्तांतरणाचा मार्ग मोकळा होणार आहे.