ट्रॅव्हल्सचे प्रवासभाडे एसटीच्या केवळ दीडपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 06:00 AM2019-11-07T06:00:00+5:302019-11-07T06:00:04+5:30
रिझर्वेशन असल्याने अनेकांना अॅडजेस्टमेंट करून प्रवास करावा लागला. या प्रवासाच्या तिकिटा मिळाल्या नाही. जादा रक्कम मात्र आकारली गेली. सण-उत्सवात घरापर्यंत वेळेत पोहोचणे महत्वाचे असल्याने, मुलबाळ सोबत असल्याने अनेकांनी तिकीट न घेता मागेल तेवढे पैसे दिले. प्रवाशांच्या या नाईलाजाचा ट्रॅव्हल्स चालकांनी चांगलाच फायदा उचलला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सण-उत्सवाचा हंगाम पाहून होणारी गर्दी कॅश करण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सकडून मनमानी पद्धतीने प्रवास भाडे आकारले जात असल्याची ओरड प्रवाशांमधून ऐकायला येत आहे. मात्र शासनाने एसटी भाड्याच्या दीडपटपेक्षा अधिक खासगी ट्रॅव्हल्सचे भाडे राहणार नाही याचे बंधन घातले आहे. या भाड्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागावर सोपविण्यात आली आहे.
गणपती, दसरा-दिवाळीच्या निमित्ताने प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. एसटी महामंडळाच्या लांबपल्ल्याच्या फेऱ्या सोईच्या वेळेत व मोठ्या संख्येने उपलब्ध नसल्याने नाईलाजाने प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सचा आश्रय घ्यावा लागतो. परंतु प्रवाशांच्या नाईलाजाचा गैरफायदा उठवित मनमानी पद्धतीने भाडे आकारले जाते. यंदाच्या दिवाळीतही अनेक ट्रॅव्हल्स बसने यवतमाळ ते पुणे, नागपूर ते पुणे, यवतमाळ ते औरंगाबाद, नाशिक या मार्गावर तिप्पट भाडे आकारल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अधिक माहिती घेतली असता प्रवाशांच्या तक्रारींमध्ये बऱ्याचअंशी तथ्य आढळून आले. रिझर्वेशन असल्याने अनेकांना अॅडजेस्टमेंट करून प्रवास करावा लागला. या प्रवासाच्या तिकिटा मिळाल्या नाही. जादा रक्कम मात्र आकारली गेली. सण-उत्सवात घरापर्यंत वेळेत पोहोचणे महत्वाचे असल्याने, मुलबाळ सोबत असल्याने अनेकांनी तिकीट न घेता मागेल तेवढे पैसे दिले. प्रवाशांच्या या नाईलाजाचा ट्रॅव्हल्स चालकांनी चांगलाच फायदा उचलला.
शासनाने २७ एप्रिल २०१८ रोजी एक आदेश जारी केला आहे. खासगी ट्रॅव्हल्सचे भाडे किती असावे याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दरनिश्चित करण्यात आले आहे. पुण्याच्या सीआयआरटी या संस्थेने कर, इंधन, देखभाल खर्च, प्रचलन दर याचा विचार करून दरनिश्चित केले आहे. त्यानुसार वातानुकूलित, अवातानुकूलित, शयनयान, शयनयान अधिक आसन व्यवस्था आदी वर्गवारी करण्यात आली. या सर्व वर्गवारीत एसटी महामंडळाच्या समकक्ष बसचे जे भाडे असेल त्याच्या जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारण्याची मुभा खासगी ट्रॅव्हल्सला देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत हे भाडे महामंडळाच्या बसच्या ५० टक्के पेक्षा अधिक असणार नाही याचे बंधन घातले गेले आहे. परंतु प्रत्यक्षात या बंधनाचे अनेक मार्गावर अनेक ट्रॅव्हल्सकडून उल्लंघन सर्रास केले जाते. तक्रार करण्यासाठी कुणाला वेळ राहत नाही, नियोजित ठिकाणी वेळेत पोहोचायचे असते. त्याचाच फायदा घेऊन प्रवाशांची लूट खासगी ट्रॅव्हल्सकडून केली जाते. ही लूट होऊ नये याची जबाबदारी प्रादेशिक परिवहन विभागावर शासनाने सोपविली आहे. मात्र या विभागाच्या ‘मिलीभगत’मुळे प्रवाशांची खुलेआम लूट होताना यंदाच्या दिवाळीतसुद्धा पहायला मिळाले. रेल्वेच्या भाड्यापेक्षा अधिक व विमानाच्या भाड्याच्या समकक्ष पर्यंत खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचे दर गेल्याचीही प्रवाशांची ओरड आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांची लूट होत असताना आरटीओची यंत्रणा नेमकी होती कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरटीओने जाणीवपूर्वक या लुटीकडे दुर्लक्ष केल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.
खासगी ट्रॅव्हल्सचे भाडे किती असावे याचे दर शासनाने निर्धारित करून दिले आहे. त्यापेक्षा अधिक दर यंदाच्या सणांमध्ये कुणीही घेतल्याची अजूनतरी तक्रार नाही. तसा प्रकार कुठे झाला असेल तर त्याचे पुरावे, तिकीट उपलब्ध करून द्यावे.
- बाबा जयस्वाल
अध्यक्ष, खासगी प्रवासी ट्रॅव्हल्स संघटना, यवतमाळ.
आरटीओकडून खासगी ट्रॅव्हल्स बसला केवळ टप्पा वाहतुकीची परवानगी
खासगी कंत्राटी अर्थात ट्रॅव्हल्स बसला परिवहन खात्याने केवळ टप्पा वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. एका ठिकाणाहून प्रवासी घेणे आणि दुसºया ठिकाणी सोडणे एवढीच ही परवानगी आहे. मधात कुठेही प्रवाशी घेण्यासाठी थांबण्याची परवानगी या खासगी ट्रॅव्हल्सला नाही. कुठे असा प्रकार असेल तर कारवाईची जबाबदारी आरटीओवर आहे. परंतु ही टप्पा वाहतूक आरटीओच्या आशीर्वादाने केवळ कागदावर असल्याचे दिसते. बहुतांश ट्रॅव्हल्स टप्पा वाहतुकीच्या नियमांना आपल्या बसच्या चाकाखाली चिरडत आहेत. कोणत्याही शहर, तालुक्याच्या ठिकाणी गेल्यानंतर किंवा मार्गातील मोठ्या गावांमध्ये सर्रास प्रवासी घेण्यासाठी या खासगी ट्रॅव्हल्स थांबत असल्याचे चित्र नागरिकांना खुलेआम पहायला मिळते. मात्र आरटीओकडून या प्रकारावर कोणतीही कारवाई होत नाही. ट्रॅव्हल्स मालक-चालक व आरटीओ यांची साखळी असल्याचे यातून स्पष्ट होते.
मनमानी प्रवासी भाडे घेतल्याबाबत रितसर तक्रार आल्यास निश्चित कारवाई केली जाईल, कुणाचीही गय केली जाणार नाही. अधिकचे प्रवासी भाडे घेतले जात आहे का हे तपासण्यासाठी आरटीओ इन्स्पेक्टरच्या ड्युट्याही लावण्यात आल्या होत्या. मात्र कुण्याही प्रवाशाने वाढीव भाडे खासगी ट्रॅव्हल्सने आकारल्याची तक्रार नोंदविलेली नाही.
- राजेंद्र वाढोकर
डेप्युटी आरटीओ, यवतमाळ.