ट्रॅव्हल्स भस्मसात; मृत्यूच्या दाढेतून परतले 20 प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2022 10:56 PM2022-10-08T22:56:42+5:302022-10-08T22:58:33+5:30

चिंतामणी ट्रॅव्हल्सची यवतमाळ-मुंबई ही एम.एच.२९/ए.डब्ल्यू.३१०० या क्रमांकाची बस शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता यवतमाळहून मुंबईसाठी निघाली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार या गाडीमध्ये ५३ व्यक्ती होत्या. त्यापैकी १२ जणांचा अपघातात मृत्यू झाला असून, यातील काहींची ओळख पटलेली नाही. मृतांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. यवतमाळ येथील लखन राठोड आणि मीराबाई राठोड या जखमींवर नाशिकच्या सिल्व्हर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे,

Travels consumed; 20 passengers returned from the jaws of death | ट्रॅव्हल्स भस्मसात; मृत्यूच्या दाढेतून परतले 20 प्रवासी

ट्रॅव्हल्स भस्मसात; मृत्यूच्या दाढेतून परतले 20 प्रवासी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळहून मुंबईसाठी निघालेल्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला शनिवारी पहाटे नाशिक येथील आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात होऊन १२ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील अजय मोहन कुचनकर या १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर २० जण बालंबाल बचावले आहेत. जखमीवर नाशिकमधील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर किरकोळ जखमी असलेल्या चौघांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 
चिंतामणी ट्रॅव्हल्सची यवतमाळ-मुंबई ही एम.एच.२९/ए.डब्ल्यू.३१०० या क्रमांकाची बस शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता यवतमाळहून मुंबईसाठी निघाली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार या गाडीमध्ये ५३ व्यक्ती होत्या. त्यापैकी १२ जणांचा अपघातात मृत्यू झाला असून, यातील काहींची ओळख पटलेली नाही. मृतांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. यवतमाळ येथील लखन राठोड आणि मीराबाई राठोड या जखमींवर नाशिकच्या सिल्व्हर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे, तर नाशिक जिल्हा रुग्णालयात अमितकुमार (यवतमाळ), सचिन जाधव, अश्विनी जाधव (पुसद), अजय शेषराव देवगन (दिग्रस), ज्ञानदेव नथू राठोड (पुसद), दीपक बजरंग शेंडे (ड्रायव्हर, यवतमाळ), सतीश बाबूसिंग राठोड, स्वरा ज्ञानदेव राठोड (यवतमाळ), अनिल चव्हाण (पुसद), हंसराज (दिग्रस), महादेव धोत्रे, पिराजी धोत्रे (आर्णी) यांचा समावेश असून, पुसद येथील प्रभादेवी केशव जाधव यांना एनडीव्हीपी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यवतमाळातीलच वैशाली बागडे आणि उज्ज्वल यांच्यासह दिग्रस येथील बादल बस्सी आणि पायल साबळे हे चौघेजण या अपघातात किरकोळ जखमी झाले होते. उपचारानंतर ते पुढे मुंबईला पोहोचले असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. दरम्यान या अपघातामुळे खासगी प्रवासी वाहतुकीच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खासगी प्रवासी वाहनांची आरटीओतर्फे नियमित तपासणी करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.

ओळख पटविण्यासाठी संपर्क करा
जिल्ह्यातील आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र त्याचे अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही. याबरोबरच सदर ट्रॅव्हल्सने आणखी काही प्रवासी ज्यांची ट्रॅव्हल्स कंपनीकडे नोंद नाही, असे या अपघातात जखमी अथवा मृत झाले असतील तर संबंधितांच्या नातेवाइकांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी ८६६८७८४८४७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

आरटीओच्या नाकर्तेपणामुळेच अपघात वाढले
आरटीओ कार्यालयातील काहींनी थेट ट्रॅव्हल्सच्या धंद्यात भागिदारी केली आहे. यासाठी स्वतंत्र कार्यालय थाटले आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्समधून अतिरिक्त होणारी प्रवासी वाहतूक याकडे दुर्लक्ष केले जाते. ट्रॅव्हल्स चालकांकडून वसुलीसाठी प्रतिनियुक्तीवर विशेष अधिकारी आणला आहे. ओव्हरलोडचाही हिशेब त्याच अधिकाऱ्याकडे आहे. आर्थिक हितसंबंधातून होत असलेल्या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष झाल्यानेच अपघात वाढले आहे. यासाठी जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे.

 

Web Title: Travels consumed; 20 passengers returned from the jaws of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग