ट्रॅव्हल्स उलटून १ ठार, १५ प्रवासी जखमी, वणीनजीक झाला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 04:39 AM2017-10-21T04:39:01+5:302017-10-21T04:39:09+5:30
समोरून येणा-या मोटारसायकलला वाचविण्याच्या प्रयत्नात चंद्रपूर-पुणे ट्रॅव्हल्स उलटून झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक जागीच ठार, तर ट्रॅव्हल्समधील १५ प्रवासी जखमी झाले.
वणी (यवतमाळ) : समोरून येणा-या मोटारसायकलला वाचविण्याच्या प्रयत्नात चंद्रपूर-पुणे ट्रॅव्हल्स उलटून झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक जागीच ठार, तर ट्रॅव्हल्समधील १५ प्रवासी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास वणी-यवतमाळ मार्गावरील पळसोनी फाट्यावर घडली.
भरत वैद्य (४०) रा.झरपट, असे मृताचे नाव आहे. या अपघातातील जखमींपैकी अनुजा टिकेकर, वय ४० (रा.तुकूम चंद्रपूर), सतीश अघेल श्रीराममुल्ला (३१), संध्या सतीश श्रीराममुल्ला (२३) श्रेयश सतीश श्रीराममुल्ला (२) सर्व रा.घुग्घूस, नीलिमा कोहाड (३२), ममता कतरे (२५), डॉ.राजेश प्रभाकर गंटुवार (५०) सर्व रा.चंद्रपूर या सात प्रवाशांना जबर मार लागला. अनेकांना किरकोळ दुखापत झाली.
चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस (क्रमांक एम.एच.२९-ए.डब्ल्यू ३३३३) चंद्रपूरवरून पुणेकडे जाण्यासाठी निघाली. वणीपासून पाच किमी अंतरावर पळसोनी फाट्याजवळ समोरून एम.एच.२९-ए.एच.९९१७ क्रमांकाची भरधाव मोटारसायकल आली.
बसचालकाने या मोटारसायकलला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र मोटारसायकलला धडक बसून त्यात मोटारसायकल चालक भरत वैद्य जागीच ठार झाला. त्यानंतर ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला उलटली.
अपघाताची माहिती मिळताच, ग्रामीण रुग्णालय परिसरातील रुग्णवाहिका घटनास्थळावर पोहचल्या. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, वाहतूक निरीक्षक संग्राम ताटे, पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश निर्मल आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले.
जखमींपैकी रुग्णवाहिकेद्वारे वणीच्या ग्रामीण रुग्णालयात तसेच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुवार यांनी ग्रामीण रुग्णालय व खासगी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.