जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या 57 रुग्णांवर सुरू आहेत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 05:00 AM2021-08-12T05:00:00+5:302021-08-12T05:00:16+5:30
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बुधवारी राज्यातील कोविड सत्यस्थिती बाबत साप्ताहिक अहवाल जारी केला. या अहवालानुसार यवतमाळ जिल्ह्याचा पाॅझिटिव्हीटी रेट ०.४० एवढा आहे. अमरावती विभागातील वाशिम जिल्ह्याचा हाच रेट ०.१९, अमरावती ०.३५, बुलडाणा १.७०, तर अकोला जिल्ह्याचा ०.९२ इतका आहे. ही आकडेवारी पाहता पाॅझिटिव्हीटी रेट कमी करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात आणखी प्रयत्नांची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी धोका अद्यापही संपलेला नसल्याचेच आरोग्य विभागाच्या अहवालावरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या विभागाने बुधवारी दिलेल्या साप्ताहिक अहवालात यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण राज्याच्या सरासरी चाचणीच्या तुलनेत कमी असल्याचे नमूद केले आहे. त्याचवेळी जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या ५७ रुग्णांवर उपचार सुरू असून आजवर या आजाराने जिल्ह्यातील चार जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बुधवारी राज्यातील कोविड सत्यस्थिती बाबत साप्ताहिक अहवाल जारी केला. या अहवालानुसार यवतमाळ जिल्ह्याचा पाॅझिटिव्हीटी रेट ०.४० एवढा आहे. अमरावती विभागातील वाशिम जिल्ह्याचा हाच रेट ०.१९, अमरावती ०.३५, बुलडाणा १.७०, तर अकोला जिल्ह्याचा ०.९२ इतका आहे. ही आकडेवारी पाहता पाॅझिटिव्हीटी रेट कमी करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात आणखी प्रयत्नांची गरज आहे. दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात कोरोना चाचण्या मात्र राज्याच्या सरासरीपेक्षा कमी होत असल्याचे या अहवालातून पुढे आले आहे. राज्यात प्रती दशलक्ष लोकसंख्येच्या तुलनेत तीन लाख ८७ हजार २२२ एवढ्या चाचण्या होत आहेत. त्या तुलनेत यवतमाळमध्ये दोन लाख १० हजार २८८ चाचण्या होत असल्याने या चाचण्या वाढविण्याची गरज आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेला हा अहवाल पाहिला असता जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. त्याचवेळी लसीकरण मोहिमेलाही गती द्यावी लागणार आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ब्रेक दि चेन मोहिमेंतर्गत एकीकडे नियम शिथील केले जात असताना जिल्ह्यासमोर तिसऱ्या लाटेचेही संकट आहे. अशा स्थितीत जिल्हावासीयांनीही कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, या अनुषंगाने नियमांचे पालन करण्याची गरज दिसून येते.
म्युकरमायकोसिसमुळे जिल्ह्यात चाैघांचा मृत्यू
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी जिल्ह्यात अजूनही म्युकरमायकोसिसचा धोका कायम असल्याचे या अहवालातून पुढे आले आहे. यवतमाळ जिल्ह्यात आजवर म्युकरमायकोसिसचे तब्बल ८६ रुग्ण आढळून आले आहे. त्यातील चार जणांचा मृत्यू झाला असून २५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर अद्यापही जिल्ह्यातील विविध रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या ५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात १८ वर्षांपेक्षा अधिकच्या २८.२८ टक्के लाभार्थ्यांचेच लसीकरण
- कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला गती देण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्याची मध्यवार्षिक लोकसंख्या ३१ लाख ११ हजार ३९ एवढी गृहित धरली असता १८ वर्षांपेक्षा अधिकच्या २३ लाख १४ हजार ९२४ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. मात्र, आजवर जिल्ह्यात १८ वर्षांपेक्षा अधिकच्या सहा लाख ५४ हजार ६९२ म्हणजेच २८.२८ टक्के लाभार्थ्यांनाच लस देण्यात आलेली आहे.