बारा नद्यांच्या किनाऱ्यावर दीड हजार किलोमीटरमध्ये वृक्षलागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:43 PM2019-07-02T12:43:55+5:302019-07-02T12:45:49+5:30

पाणीटंचाई, महापुराच्या समस्यांवर मात करण्यासोबत नद्यांचे पात्र सुरक्षित ठेवण्यासाठी आता नद्यांच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाणार आहे.

Tree plantation on the banks of rivers bank of twelve thousand kilometers | बारा नद्यांच्या किनाऱ्यावर दीड हजार किलोमीटरमध्ये वृक्षलागवड

बारा नद्यांच्या किनाऱ्यावर दीड हजार किलोमीटरमध्ये वृक्षलागवड

Next
ठळक मुद्देयवतमाळ, वाशिम, अकोल्यातील नद्या दोन कोटी ४० लाख वृक्षांची तजवीज

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पाणीटंचाई, महापुराच्या समस्यांवर मात करण्यासोबत नद्यांचे पात्र सुरक्षित ठेवण्यासाठी आता नद्यांच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाणार आहे. यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील नदीपात्रात ही मोहीम राबविली जाणार आहे. त्याकरिता वनविभागाकडून १२ नद्यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे उन्हाळ्यात नदीपात्र कोरडे पडणार नाही, तर पावसाळ्यात नदीकाठावरील भूस्खलन थांबविता येणार आहे.
यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्यात पावसाळ्यात सरासरी ८०० ते १००० मिलीमीटर पावसाची नोंद केली जाते. मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही उन्हाळ्यात नदी कोरडी पडते. गेल्या १५-२० वर्षात नदीपात्र कोरडे होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर मात करण्यासाठी नदीच्या किनारा क्षेत्रात वृक्षलागवड करण्याचा कृती आराखडा वनविभागाने तयार केला आहे. यासाठी तीन जिल्ह्यातील प्रमुख १२ नद्यांची निवड झाली आहे. नदी किनारा क्षेत्रातील १३१६ किलोमिटर परिसरात लागवड होणार आहे. यामध्ये बारमाही हिरवे वृक्ष तसेच साग, आजन आणि इतर वृक्षांचा समावेश राहणार आहे.
या मोहिमेसाठी दोन कोटी ४० लाख राखीव वृक्षांमधून काही वृक्ष वनविभाग पुरविणार आहे. पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावरील ४७५ किलोमिटर परिसरात वृक्ष लागवड होणार आहे. यासोबतच वाघाडी ५९ किलोमिटर, अरुणावती १४ किलोमिटर, अडाण ४५ किलोमिटर, वर्धा नदी १४५ किलोमिटर, खुनी नदी ३४ किलोमिटर, पूस नदी २७ किलोमिटर, बेंबळा नदी २७ किलोमिटर, विदर्भा नदी २२ किलोमिटर, काटेपूर्णा, मोर्णा, पूर्णा नदीच्या ३१३ किलोमिटर परिसरात वृक्षलागवड होणार आहे.

लागवड होणारे नदीपात्र
तीन जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्यांलगत ही वृक्षलागवड होणार आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगेच्या काठावरील ४७५ किलोमिटरमध्ये लागवड होईल. वाघाडी ५९ किमी, अरुणावती १४, अडाण ४५, वर्धा १४५.५, खुनी ३४, पूस २७, बेंबळा २७, तर विदर्भा नदी काठावर २२ किलोमिटरमध्ये लागवड केली जाईल. शिवाय अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, मोर्णा, पूर्णा नदीकाठावर ३१३ किलोमिटरमध्ये तर वाशिम जिल्ह्यात अडाण, पैनगंगा, मोर्णा नदी काठावरील १६० किलोमिटरमध्ये लागवड होणार आहे.

असा होणार फायदा
नदी काठावर वृक्षलागवड झाल्याने पाण्याचे स्त्रोत दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल. नदीपात्रात होणारे अतिक्रमण थांबविता येणार आहे. पर्यावरण संरक्षण होणार आहे. नदीपात्राचे वारंवार होणारे भूस्खलन थांबेल. वन्यप्राणी, पक्षी आणि नागरिकांना येथे थोडा विसावा घेता येणार आहे.

नद्यांच्या किनारा क्षेत्रात वृक्षलागवड होणार आहे. त्यासाठी वनविभाग वृक्ष पुरविणार आहे. यातून पर्यावरण समृद्धीचा प्रयत्न होणार आहे. नद्यांचे जलस्त्रोत बळकट केले जाणार आहे.
- अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, यवतमाळ

Web Title: Tree plantation on the banks of rivers bank of twelve thousand kilometers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी