वृक्ष लागवड मोहिमेत पारंपरिक वृक्ष वनविभागाकडून बेदखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 09:44 PM2019-07-06T21:44:22+5:302019-07-06T21:45:07+5:30
शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत विदेशी वृक्ष लागवडीवरच भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. वड, उंबर, पिंपळ, बेल, कदंब, आपटा, मोहा, टेंभूर्णी, बिबा, शेवगा, सागरगोटा, हिरडा, रिठा, चारोळी, या वृक्षांच्या लागवडीबाबत वनविभाग अनास्था बाळगून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत विदेशी वृक्ष लागवडीवरच भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. वड, उंबर, पिंपळ, बेल, कदंब, आपटा, मोहा, टेंभूर्णी, बिबा, शेवगा, सागरगोटा, हिरडा, रिठा, चारोळी, या वृक्षांच्या लागवडीबाबत वनविभाग अनास्था बाळगून आहे.
वणी, पांढरकवडा व झरी या तालुक्यातील वनविभागाच्या नर्सरीमध्ये कडूनिंब, साग, बांबू या वृक्षांची रोपसंख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. काही ठिकाणी जांभूळ, खैर, आवळा, बोर, आजण, चिंच या वृक्षांची रोपेदेखील आढळून आली. मात्र यात जास्त प्रमाणात कडूनिंबाच्या रोपांची लागवड होताना दिसून येत आहे. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी वृक्ष लागवडीमध्ये स्थानिक प्रजातींना प्राधान्य द्या, असे सांगितले आहे. तथापि त्या दिशेने अद्यापही फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. यवतमाळ जिल्ह्यात बेहाडा या वृक्षासाठी अतिशय पोषक वातावरण आहे. पण त्यासाठी ती रोपे उपलब्ध नाही. बेल, कदंब, रिठा, बिबा, शेवगा या जातीच्या वृक्षांना अतिशय कमी पाणी लागते. पण त्याचीही रोपे उपलब्ध नाही. वनविभागात ही कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याबाबत चांगली माहिती असली तरी उच्चपदस्थ अधिकाºयांमध्ये मात्र याबाबत अनास्था आहे.
यालट सुईबाभूळ, सप्तपर्णी, गुलमोहर या विदेशी झाडांच्या लागवडीवर जास्त भर दिला जात आहे. विशेष म्हणजे या झाडांवर पाखरे बसत नाही. या झाडांची पाणी शोषण्याची क्षमताही अधिक आहे. असे असतानाही लागवडीसाठी याच वृक्षांना प्राधान्य दिले जात आहे. गुलमोहराचे झाड मादागास्कर येथून भारतात आणले आहे. याची लालभडक फुले कुणालाही आकर्षित करून घेणारी असली तरी त्या फुलांना सुगंध नाही. निलगीरीचे झाड आॅस्ट्रेलियातून १९५२ साली आयात केलेल्या गव्हासोबत आले आहे. हे झाड जमिनीतील पाणी इतर झाडांच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त स्वत:कडे ओढून घेते. परिणामी जलस्त्रोत सुष्क होतो.
लागवडीनंतरही वृक्षांचे अस्तित्व नाही
वृक्ष लागवडीच्या नावाखाली दरवर्षी हजारो झाडे लावली जातात. पिंपळ, कडूनिंब, चिंच, आवळा, बोर या वृक्षांचीही लागवड दरवर्षी करण्यात येते. परंतु चार वर्षानंतरही टिपेश्वर अभयारण्यात या झाडांचे अस्तित्व दिसून येत नाही.