नेरमध्ये वृक्षलागवड घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 10:33 PM2017-12-22T22:33:18+5:302017-12-22T22:33:35+5:30
वृक्ष लागवडीच्या नावाखाली तालुक्यात पैशाचा चुराडा करण्यात आला आहे. लाख, दोन लाख नव्हेतर दहा लाख रुपये खर्च यासाठी करण्यात आला. प्रत्यक्षात अपवादानेच झाडे दिसत असल्याने या योजनेत मोठा घोटाळा झाला असल्याच्या बाबीला बळ मिळत आहे.
किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : वृक्ष लागवडीच्या नावाखाली तालुक्यात पैशाचा चुराडा करण्यात आला आहे. लाख, दोन लाख नव्हेतर दहा लाख रुपये खर्च यासाठी करण्यात आला. प्रत्यक्षात अपवादानेच झाडे दिसत असल्याने या योजनेत मोठा घोटाळा झाला असल्याच्या बाबीला बळ मिळत आहे. प्रस्तूत प्रतिनिधीने प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत या बाबी पुढे आल्या आहे. प्रशासनाकडून सांगितल्या जात असलेल्या झाडांपैकी केवळ २० टक्के रोपांचे अस्तित्व तेवढे दिसत आहे.
पंचायत समितीमार्फत वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. ५१ ग्रामपंचायतीला प्रत्येकी ४०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. झाडे जगविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने दोन मजूर लावायचे होते. ग्रामपंचायतींनी वृक्षलागवड आणि मजुरांसाठीचा खर्च झाल्याचे दाखविले. परंतु झाडांचे अस्तित्व कुठेही नाही. २० टक्के जिवंत झाडाच्या भरवशावर वृक्षलागवडीचा फार्स केला जात आहे.
अडगाव ग्रामपंचायतीने ४०० झाडे लावली. यातील २५० जिवंत असल्याचा दावा करण्यात आला. यावर ४२ हजार ३५४ रुपये ८५ पैसे एवढा खर्च करण्यात आला. याच ग्रामपंचायतीने स्मशानभूमीतही ४०० झाडे लावली असल्याचे दाखविले गेले. २१ हजार ४८५ रुपये ७४ एवढा खर्च यावर करण्यात आला. या शिवाय बोरगाव ग्रामपंचायतीने २० हजार ९०५ रुपये, ब्राह्मणवाडा पश्चिम १४ हजार ३०० रुपये ६४ पैसे, चिकणी डोमगा ४० हजार ९४० रुपये ३२ पैसे, दहीफळ ४१ हजार ३० रुपये सात पैसे, दोनद ३४ हजार ७५२ रुपये ८४ पैसे, जवळगाव ५८ हजार ६६ रुपये ९८ पैसे, कोहळा ग्रामपंचायतीने १८ हजार २७१ रुपये ८४ पैसे एवढा खर्च वृक्ष लागवडीवर दाखविला आहे. या शिवाय मोझर, पांढरी, पाथ्रड गोळे, पिंपळगाव डुब्बा, रत्नापूर, शहापूर, शिरसगाव, सिंदखेड, टाकळी सलामी, उमर्डा, वटफळी या ग्रामपंचायतींनी २० हजारावर खर्च दाखवून निधी लाटला आहे.
चिखली कान्होबा, चिचगाव, पांढरी या ग्रामपंचायतींनी ४०० झाडे लावण्यासाठी येत असलेल्या खर्चापेक्षा कमी रक्कम खर्च झाल्याचे दाखविले आहे. सर्व ५१ ग्रामपंचायतींसाठी नऊ लाख ८१ हजार खर्च दाखविण्यात आला आहे. झाडांची संख्या कमी आहे. त्यावेळी खरंच एवढा खर्च वृक्ष लागवडीवर झाला असावा याविषयी संशयाला बळ मिळत आहे.
पाणी टंचाईचा बहाणा, मजुरांसाठी निधी मात्र वापरला
बहुतांश ग्रामपंचायतींनी वृक्षलागवडीवर मोठी रक्कम खर्ची घातली आहे. झालेल्या कामाची पाहणी अधिकारीस्तरावर केली गेली. या अधिकाºयांना सर्वकाही ठिकठाक दाखविले गेले. प्रत्यक्षात झाडे दिसत नसताना अधिकाºयांनीही ‘पास’ करून टाकले. या कामांची देयके काढताना कमिशनबाजी झाल्याची शंका व्यक्त होत आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने झाडे जगतील कशी, असा प्रश्न ग्रामसेवकांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र झाडांना पाणी टाकण्यासाठी मजूर उपलब्ध करू देण्यात आले. यासाठी निधीही दिला. तरीही झाडे जगविता का आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.