मावळ्यांची गर्जना, जय शिवाजी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 09:47 PM2019-03-23T21:47:06+5:302019-03-23T21:48:05+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती शनिवारी जिल्हाभरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यवतमाळ शहरासह दिग्रस, पुसद, घाटंजी, पांढरकवडासारख्या ठिकाणी यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती शनिवारी जिल्हाभरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यवतमाळ शहरासह दिग्रस, पुसद, घाटंजी, पांढरकवडासारख्या ठिकाणी यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले.
यवतमाळ येथे माळीपुऱ्यातील शिवाजी चौकातील श्री शिवाजी मंडळ दरवर्षी तिथीनुसार शिवजन्मोत्सव साजरा करते. यंदाही ही परंपरा मंडळाने कायम राखली. संपूर्ण राज्यात दोनच ठिकाणी शिवजन्माचा पाळणा केला जातो. त्यामध्ये यवतमाळचा समावेश आहे. यंदा भल्या पहाटे शिवजन्म साजरा करून पाळण्यात नामकरण विधीही करण्यात आला. या ठिकाणी शनिवारी विश्व मांगल्य सभा पार पडली. यावेळी सई राम पंचभाई या बाल कीर्तनकाराने शिवजन्मोत्सवानिमित्त सुंदर कीर्तन सादर केले.
शिवजयंतीनिमित्त मुलांसाठी पाच किलोमीटर आणि मुलींसाठी तीन किलोमीटर अंतराची दौड स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. प्रभातफेरीमध्ये आबालवृद्धांनी सहभाग घेतला. तर सायंकाळी शिवजयंतीची रॅली आयोजित करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गाने निघालेल्या या रॅलीमध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. भगवे फेटे घातलेले तरुण छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत होते. रॅलीतील शिवकालीन देखाव्यांनीही लक्ष वेधून घेतले. चंद्रकांत गड्डमवार यांच्या नेतृत्वात शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिवप्रेमी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला.
यवतमाळप्रमाणेच दिग्रस येथेही दुचाकी रॅली काढण्यात आली. भगवे झेंडे घेतलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी लक्ष वेधून घेतले. घाटंजी, पांढरकवडा, पुसद येथेही विविध कार्यक्रम पार पडले.