यवतमाळात ‘व्हर्च्यूअल मनी’ खरेदीचा ट्रेन्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:24 PM2018-05-20T23:24:29+5:302018-05-20T23:24:29+5:30
‘व्हर्च्यूअल मनी’ खरेदीचा ट्रेन्ड यवतमाळातही मोठ्या प्रमाणात दिसत असून अनेकांना बिटक्वॉईनने भुरळ घातली आहे. अशातच यवतमाळातील एका महिलेला बिटक्वॉईनच्या नावाखाली ९२ हजाराचा गंडा घातल्याचे उघडकीस आले.
सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘व्हर्च्यूअल मनी’ खरेदीचा ट्रेन्ड यवतमाळातही मोठ्या प्रमाणात दिसत असून अनेकांना बिटक्वॉईनने भुरळ घातली आहे. अशातच यवतमाळातील एका महिलेला बिटक्वॉईनच्या नावाखाली ९२ हजाराचा गंडा घातल्याचे उघडकीस आले.
बँकिंग क्षेत्रात नोटाबंदीनंतर सर्वसामान्य नागरिकांचा पैसा गुंतविण्याचा ट्रेन्ड कमी झाला आहे. कमी व्याजदर आणि इतर कारणाने अनेक जण आपला पैसा आॅनलाईन पद्धतीने गुंतविण्याचा पर्याय निवडत आहे. जागतिक बाजारपेठेत गत काही वर्षांपासून आभासी चलन (र्व्हच्युअल मनी) खरेदीचा कल वाढत आहे. महानगरात असलेला हा ट्रेन्ड आता यवतमाळ सारख्या शहरातही आता बिटक्वॉईन खरेदी केले जात आहे. जागतिक स्तरावर बिटक्वॉईनच्या माध्यमातून देवाणघेवाण होत आहे. पूर्वी मोठे माफिया, शिपींग कार्पोरेशन या क्रिप्टेड करन्सीच्या माध्यमातून स्वत:चे चलन निर्माण करीत होते. यासाठी काही अधिकृत वेबसाईटसुद्धा आहे. जवळपास ४०० कंपन्या अशा चलनाची खरेदी-विक्री करतात. हा हायप्रोफाईल ट्रेन्ड आता लहान शहरातही पोहोचत आहे. मात्र या व्यवहाराची पुरेशी माहिती नसल्याने अनेकांची फसवणूक होत आहे. गत काही महिन्यापूर्वी नांदेडमध्ये बिटक्वॉईनच्या नावाखाली मोठा गंडा घालण्यात आला होता. असाच गंडा यवतमाळातही एका महिलेला घातला आहे.
समर्थवाडीतील सविता मनोज व्यवहारे यांनी नागपूर येथील आपल्या बहिणीची मैत्रीण ज्योती विपीन घरडे रा. भवन स्कूलच्या मागे, नागपूर यांच्याकडून बिटक्वॉईनबाबत माहिती घेतली. ज्योतीने सांगितल्यावरून त्यांनी पैसा गुंतविण्याची तयारी दर्शविली. यानंतर ज्योतीने प्रशांत नंदनवार यांच्याशी ओळख करून दिली. नंदनवार याने सदर कंपनीमध्ये पैसे गुंतविल्यास स्वत:चे अकाऊंट उघडले जाते. त्यानंतर दोन सदस्य केले तर प्रत्येक सदस्यामागे काही रक्कम मिळते, असे सांगितले. प्रत्येक दिवशी दोन डॉलर रिटर्न जमा होतो, असेही सांगितले. त्यावरून सविता यांनी नंदनवार यांना ७० हजार रुपये दिले. तसेच खाते उघडण्यासाठी दोघांचे १४ हजार रुपये दिले. त्यानंतर सविताने प्रशांतला पैसे विड्रॉल करण्यास सांगितले. त्यानंतर मात्र अकाऊंटमध्ये पैसे येणे बंद झाले. याबाबत ज्योती घरडे आणि प्रशांत नंदनवार यांच्याशी संपर्क केला. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली ९२ हजाराने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अवधूतवाडी ठाण्यात तक्रार दाखल केली. सहायक निरीक्षक सुगत पुंडगे अधिक तपास करीत आहे.
काय आहे बिटक्वॉईन?
जागतिक बाजारपेठेत डॉलरपेक्षाही अधिक किंमत बिटक्वॉईनला आहे. याला क्रिप्टेड करन्सी (आभासी चलन) असेसुद्धा म्हणतात. एका बिटक्वॉईनची किंमत हजारो डॉलरच्या घरात आहे. बिटक्वॉईन खरेदीसाठी एक पेनड्राईव्हमध्ये लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिला जातो. या आधारावर जगात कुठेही तुम्हाला डॉलरमध्ये पैसा उपलब्ध होतो. यात आभासी चलनाच्या ४०० वर कंपन्या असल्या तरी सर्वाधिक भाव बिटक्वॉईनलाच आहे.