रस्त्यावर मास्कची ट्रायल ठरते कोरोना संसर्गाचे प्रमुख साधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 05:00 AM2020-11-05T05:00:00+5:302020-11-05T05:00:03+5:30
मास्क वापराबाबत मुली, महिला व युवकांमध्ये फॅशनकडेही लक्ष दिले जात आहे. सुरुवातीला केवळ औषधी दुकानातून विकले जाणारे मास्क आता कापड दुकानातही विक्रीला ठेवले आहे. त्याचे अनेक आकार आहेत. कापडाबाबतही विविध दावे केले जातात. सुरुवातीला तज्ज्ञांकडून एन-९५ हा मास्क उत्कृष्ट असल्याचे सांगितले जात होते.
n सुरेंद्र राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाचा धोका रोखण्यासाठी सर्वप्रथम प्रत्येकाने मास्क वापरावा असे सूचविण्यात आले. आता रस्त्यारस्त्यावर मास्कची विक्री होत आहे. रस्त्यावर विकला जाणारा मास्क आपल्या साईजचा आहे का हे पाहण्यासाठी प्रत्येक जण सहज ट्राय करीत आहे. यातून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार होण्यासाठी प्रमुख साधन उपलब्ध झाले आहे.
मास्क वापराबाबत मुली, महिला व युवकांमध्ये फॅशनकडेही लक्ष दिले जात आहे. सुरुवातीला केवळ औषधी दुकानातून विकले जाणारे मास्क आता कापड दुकानातही विक्रीला ठेवले आहे. त्याचे अनेक आकार आहेत. कापडाबाबतही विविध दावे केले जातात. सुरुवातीला तज्ज्ञांकडून एन-९५ हा मास्क उत्कृष्ट असल्याचे सांगितले जात होते.
साठेबाजीमुळे त्याची किंमत वाढवून काळाबाजार झाला. तेव्हा कापडाच्या मास्कचा वापरसुद्धा सुरक्षित असल्याचा निर्वाळा पुढे आला. तसे बाजारात विविध रंगाचे, कापडाचे मास्क विक्रीसाठी आहेत.
यवतमाळातील टांगा चौकात ग्राहकांचा क्लास ओळखून मास्क विक्रीला ठेवले आहे. अगदी १० रुपयांपासून १०० रुपयापर्यंतचे मास्क येथे मिळतात. रस्त्यावर आकर्षक पद्धतीने हे मास्क लावलेेले आहेत. त्यात आपल्या आकाराचा मास्क शोधून तो ट्राय केला जातो. कम्फर्ट वाटला नाही तर लगेच दुसरा ट्राय केला जातो. या पद्धतीमुळे कोरोना फैलावण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.
सणा-सुदीच्या काळात ग्रामीण भागातून अनेक जण मोठ्या संख्येने खरेदीसाठी येतात. आता दिवाळी सण असल्याने मेनलाईनमधील कापड दुकानात अगदी रस्त्यावर मास्कचे स्टॅन्ड असे लटकविलेले आहे. रस्त्यावरील धूळ, कुणाची शिंक, थुंकी सहज या मास्कवर उडू शकते. न दिसणारे कण कोरोना सोबत मास्कवर राहू शकतात. त्याचा ट्राय न करताही वापर केल्यास कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे.
रेडिमेड कापड दुकानात कारागृहासमोर मास्क विक्रीला ठेवले आहेत. हा मास्क निवडताना दुकानदार जवळ येत नाही. ग्राहक आपल्या सोईने विविध रंगाचे मास्क ट्राय करून पाहतात. विशेष करून महिला वर्गात हा प्रकार मोठ्या प्रमाणात पहावयास मिळाला. फॅशन व रंगसंगतीच्या नादात आपण कोरोनाला आमंत्रण देत आहोत हे मास्क खरेदी करणाऱ्यांच्या लक्षातच येत नाही. दुकानदार पैसे घेण्यापुरती तसदी घेतो.
चेहऱ्यावर फिटोफिट बसणारा मास्क नको का?
रस्त्यावर मास्क खरेदी करताना काही ग्राहकांशी संवाद साधला. त्यांनी अफलातून प्रतिक्रिया दिली. चेहऱ्याला साजेसा व फिटोफिट बसणारा मास्क नको का असा प्रतिप्रश्न केला. सुरक्षेच्या मुद्यावर विचारले असता त्यांनी बोलण्याचे टाळले. महागडे व ब्रॅन्डेड मास्क आमच्या ऐपतीत बसत नाही. त्यामुळे रस्त्यावरच निवडावा लागतो, अशीही प्रतिक्रिया काही ग्राहकांनी दिली. सर्वांनीच कोरोनाच्या संसर्गाची भीती व्यक्त करताच चुकत असल्याचे मान्य केले.