आदिवासी बांधवांनी संघटितपणे पुढे यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:11 AM2018-11-18T00:11:53+5:302018-11-18T00:13:07+5:30
सर्वाधिक प्रामाणिक आणि शांतताप्रिय समाज म्हणून आदिवासी समाजाकडे पाहिले जाते. या समाजाचे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी एक अजेंडा तयार करून त्याचा सतत पाठपुरावा करावा लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सर्वाधिक प्रामाणिक आणि शांतताप्रिय समाज म्हणून आदिवासी समाजाकडे पाहिले जाते. या समाजाचे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी एक अजेंडा तयार करून त्याचा सतत पाठपुरावा करावा लागणार आहे. त्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन संघटितपणे पुढे येणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांनी केले.
स्थानिक समता मैदानावर शनिवारी दोन दिवसीय राज्यस्तरीय बिरसा पर्वाचे उद्घाटन झाले. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात मोघे बोलत होते. उद्घाटक म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, बिरसा मुंडा यांचे नातू सुकराम आणि सानिक मुंडा होते. प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार प्रा.डॉ.अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, माजी आमदार डॉ.संदीप धुर्वे, नगराध्यक्ष कांचन चौधरी, बिरसा पर्व उत्सव समितीचे अध्यक्ष राजू चांदेकर, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वासूदेवशाह टेकाम, आॅल इंडिया फेडरेशनचे केंद्रीय कार्याध्यक्ष सुरेश कन्नाके, पणन महासंघ संचालक सुरेश चिंचोळकर, पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजूदास जाधव, शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख संतोष ढवळे, ज्येष्ठ साहित्यिक उद्धवराव येरमे, आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक मिनाक्षी वेट्टी, राजू केराम, पवन आत्राम उपस्थित होते.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, देशभरात ३० नोव्हेंबरपर्यंत बिरसा पर्व साजरे केले जाणार आहे. लोकसभेत बाबूराव शेडमाके यांचे तैलचित्र लावण्याचा ठराव घेण्यात आला आहे.
डॉ. संदीप धुर्वे यांनी बिरसा मुंडा यांना मरणोपरांत भारतरत्न देण्याची मागणी केली. नगराध्यक्ष कांचन चौधरी म्हणाल्या, बिरसा मुंडा यांचा पुतळ्यासाठी जागा सुचविण्यात यावी. सुकरामजी मुंडा यांनी अन्यायाविरोधात पेटून उठण्याचे आवाहन केले.
सत्ताधारी आमदारांवर आयोजकांची सरबत्ती
आदिवासींचे २५ आमदार विधानसभेत आहे. तरीही आदिवासींचे प्रश्न सुटले नाही, अशी खंत बिरसा पर्व उत्सव समितीचे अध्यक्ष राजू चांदेकर यांनी मांडली. गैरआदिवासींना संरक्षण दिल्या जात असल्याच्या मुद्यावर रोष व्यक्त केला. कुमारी माता प्रकरणात दोषींना फाशी द्यावी. मात्र कुमारी मातांना केवळ मदतीवर समजावले जात असल्याची खंत व्यक्त केली.