क्षेत्रबंधन उठल्याने आदिवासींचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 10:35 PM2017-09-25T22:35:10+5:302017-09-25T22:35:26+5:30
क्षेत्रबंधन कायदा रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या माध्यमातून शिवाजीराव मोघे यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : क्षेत्रबंधन कायदा रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या माध्यमातून शिवाजीराव मोघे यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली. सतत दहा वर्ष आदिवासी युवक संघाद्वारे सनदशीर मार्गाने संघर्ष केला. तब्बल ४१ वर्षानंतर वसंतराव नाईकांच्या प्रयत्नाने क्षेत्रबंध उठले आणि आदिवासींचा खरा विकास झाला, असे प्रतिपादन काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले.
आदिवासी नेते माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे लिखित ‘आदिवासींचे क्षेत्रबंधन आणि इंदिरा गांधी’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुसद येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकरराव नाईक प्रेक्षागृहात आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार मनोहरराव नाईक होते. प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे उपसभापती आमदार माणिकराव ठाकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, आमदार अशोक टारफे, माजी मंत्री प्रा.वसंतराव पुरके, माजी आमदार विजय खडसे, लक्ष्मणराव तायडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, अॅड. सचिन नाईक उपस्थित होते. उपसभापती माणिकराव ठाकरे म्हणाले, लोकशाही आबाधित ठेवण्याचे कार्य काँग्रेस पक्षाने केले. इंदिरा गांधींची कामगिरी देश कधीही विसरु शकत नाही. प्रास्ताविकात अॅड. शिवाजीराव मोघे यांनी इंदिरा गांधी व वसंतराव नाईक यांच्या सहकार्यातून क्षेत्रबंध कायदा हटविण्यात आला. ही माहिती तरुणांना व्हावी यासाठी पुस्तक लिहिल्याचे सांगितले. कार्यक्रमाला तातू देशमुख, जीवन पाटील, रेखाताई मोघे, पी.बी. आडे, जय नाईक, अॅड. दिलीप एडतकर, अजय पुरोहित, मारोतराव वंजारे, रामकृष्ण चौधरी, जितेंद्र मोघे, शामराव व्यवहारे उपस्थित होते. संचालन सुरेश धनवे यांनी तर आभार अजाबराव उईके यांनी मानले.