पुसदमध्ये आदिवासी वसतिगृहाला अखेर जागा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:42 AM2021-03-18T04:42:05+5:302021-03-18T04:42:05+5:30

विरोधकांच्या आंदोलनामुळे व आमदार इंद्रनील नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृह व आदिवासी ...

The tribal hostel in Pusad will finally get a place | पुसदमध्ये आदिवासी वसतिगृहाला अखेर जागा मिळणार

पुसदमध्ये आदिवासी वसतिगृहाला अखेर जागा मिळणार

Next

विरोधकांच्या आंदोलनामुळे व आमदार इंद्रनील नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृह व आदिवासी विकास प्रकल्पाच्या बांधकामासाठी जिल्हा परिषद कन्या शाळेची जागा जिल्हा परिषदेने परवानगी दिल्याने उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरच बांधकामास सुरुवात होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

काँग्रेसचे नेते ॲड. सचिन नाईक, भाजपच्या डॉ. आरती फुपाटे, शिवसेनेचे ज्ञानेश्वर तडसे आदींनी कारला रोडवरील यवतमाळ जिल्हा सहकारी कापड सूतगिरणीची जागा द्यावी, यासाठी अनेकदा आंदोलन, उपोषण केले होते.

अखेर आमदार इंद्रनील नाईक यांनी पुसदमधील जिल्हा परिषद कन्या शाळेची जागा उपलब्ध करून देऊ, असा शब्द दिला होता. त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना यासंदर्भात ठराव घेण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सभागृहात तसा प्रस्ताव ठेवला. सभेत कन्या शाळेची २ हेक्टर ६०आर जागा आदिवासी वसतिगृह व आदिवासी प्रकल्पास देण्यास हरकत नाही, असा ठराव मंजूर झाला आहे. त्यानुसार आदिवासी प्रकल्पासाठी एक हेक्टर जागा, मुलांच्या वसतिगृहासाठी .५०हेक्टर जागा, मुलींच्या वसतिगृहासाठी .५० हेक्टर जागा व आदिवासी सांस्कृतिक भवनासाठी .६०हेक्टर जागेची मागणी करण्यात आली आहे. या सर्व कामासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला आहे. आता तांत्रिक बाबींची पूर्तता झाली की लवकरच बांधकामास सुरुवात होणार आहे.

मात्र, डॉ. आरती फुपाटे यांनी खरे पाहता सूतगिरणीची शासन जमा असलेली चार हेक्टर ५२आर जागा मिळायला पाहिजे होती. परंतु आता कन्या शाळेची जागा देण्याचा ठराव झाला आहे. तेव्हा आता लवकरात लवकर बांधकाम सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ॲड. सचिन नाईक व ज्ञानेश्वर तडसे यांनी वसतिगृह व आदिवासी प्रकल्पाला जागा उपलब्ध केल्याबद्दल आभार मानत काम लवकर सुरू करावे, अशी मागणी केली. जुन्या सूतगिरणीची चार हेक्टर ५२ आर. जागा प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी मिळावी, यासाठी आंदोलन करू असे मत तडसे यांनी व्यक्त केले.

Web Title: The tribal hostel in Pusad will finally get a place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.