आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींच्या नावावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:45 AM2021-09-25T04:45:46+5:302021-09-25T04:45:46+5:30
माहूर : आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींनी गिळंकृत केल्याची हजारो प्रकरणे राज्यात न्यायप्रविष्ट आहेत. आदिवासींच्या जमिनीची लूट त्या-त्या भागातील अधिकाऱ्यांच्या ...
माहूर : आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींनी गिळंकृत केल्याची हजारो प्रकरणे राज्यात न्यायप्रविष्ट आहेत. आदिवासींच्या जमिनीची लूट त्या-त्या भागातील अधिकाऱ्यांच्या सहमतीने झाली. त्यामुळे आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींच्या नावावर करून देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी केली.
प्रा. पुरके यांनी गुरुवारी माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. प्रथम दोसानी परिवार व पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एस. एस. पाटील यांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नंतर पत्रकारांशी बातचीत करताना माजी मंत्री प्रा. पुरके यांनी बोगस आदिवासींच्या प्रकरणावर प्रकाश टाकला. राज्यातील इतर भागांसह माहूर, किनवट तालुक्यातसुध्दा मोठ्या प्रमाणत आदिवासी समाजाच्या हक्काच्या नोकऱ्या, शैक्षणिक व इतर सवलती बोगस आदिवासींनी बळकावल्याचे त्यांनी सांगितले.
हजारो कोटींच्या आदिवासींच्या जमिनीवर गैर आदिवासींचा ताबा आहे. तालुक्यातील सारखणी येथील सीताराम रामजी डोनीकर यांच्या ३२ एकर भूखंडाप्रमाणे राज्यात हजारो प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. माझ्या मतदार संघातसुद्धा एका आदिवासी कोलम समाजातील शेतकऱ्याची जमीन रेल्वेमध्ये गेली. मात्र, गैर आदिवासींनी शासनाकडून मिळणारा मोबदला लाटण्यासाठी ती आपल्या नावावर करून घेतली होती, असे सांगितले. ६ कोटी १९ लाख रुपयांच्या मोबदल्याचे हे प्रकरण व देवधरी, ता. राळेगाव येथील कोवे नामक शेतकऱ्याची २५ एकर जमीन एका माजी आदिवासी मंत्र्याने शेतकऱ्यांच्या मानसिक दुर्बलतेचा फायदा उचलून घेतली होती, असेही स्पष्ट केले. ही दोन्ही प्रकरणे न्यायालयात असून, एका प्रकारात मी स्वतः याचिका दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
बॉक्स
लवकरच महसूल मंत्र्यांना भेटणार
आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणार असल्याचे प्रा. पुरके यांनी स्पष्ट केले. ज्या अधिकाऱ्यांनी आदिवासी जमिनीचे वाटोळे केले, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून शिक्षा व्हावी, अशी मागणी आपण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आपण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी रघुनाथ कापर्तीवार, संतोष अग्रवाल, नंदू संतान, हाजी कादर दोसानी, गजानन कुलकर्णी, सरफराज दोसानी आदी उपस्थित होते.