आदिवासी युवकांनी एव्हरेस्ट शिखर सर केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 10:21 PM2019-02-16T22:21:13+5:302019-02-16T22:21:36+5:30

देशाचे नेतृत्व करणाऱ्या या नेत्याने शनिवारी जिल्ह्यात आल्यावर स्थानिक रहिवाशांच्या कलाने भाषण केले. यवतमाळसह चंद्रपूर-गडचिरोली भागातील आदिवासी युवकांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.

Tribal youth heads the summit | आदिवासी युवकांनी एव्हरेस्ट शिखर सर केला

आदिवासी युवकांनी एव्हरेस्ट शिखर सर केला

Next
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गौरवपूर्ण उल्लेख : पांढरकवडा येथील महिला महामेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा (यवतमाळ) : देशाचे नेतृत्व करणाऱ्या या नेत्याने शनिवारी जिल्ह्यात आल्यावर स्थानिक रहिवाशांच्या कलाने भाषण केले. यवतमाळसह चंद्रपूर-गडचिरोली भागातील आदिवासी युवकांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. तसेच चंद्रपूरच्या इको प्रो या संस्थेच्या युवकांनी राबविलेल्या किल्ला सफाई अभियानाचेही त्यांनी आवर्जुन कौतुक केले. तर यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीच्या महिला बचत गटाने बकरीच्या दुधापासून साबण तयार केल्याची कामगिरी आपण यापूर्वी ‘मन की बात’मधूनही मांडल्याचे त्यांनी सांगितले.
अहिरांनी मांडली विकासगाथा
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून केंद्रीय गृहराज्यमंत्री हसंराज अहीर यांनी चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील विकासकामांची माहिती दिली. यवतमाळ जिल्ह्यात १७ हजार पेक्षा, तर चंद्रपूर जिल्ह्यात १५ हजारपेक्षा अधिक बचत गट निर्माण झाले आहे. या माध्यमातून महिला व्यवहारी व उद्योजक बनत आहेत. यासोबतच जिल्ह्यात कृषी सिंचन योजना, बळीराजा सिंचन योजना, पैनगंगा नदीवरील बॅरेज, जलयुक्त शिवार या विकासकामांचा आढावा भाषणातून घेतला. दाभडी येथील ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात दिलेले आश्वासन पूर्ण केल्याबद्दल ना. अहीर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. देशात व राज्यात भाजपाची सत्ता आली त्यावेळी यवतमाळ जिल्ह्यात रबीचे क्षेत्र केवळ ८७ हजार हेक्टर होते. आजघडीला ते १ लाख ४४ हजार हेक्टरवर रबीचा हंगाम घेतला जात आहे. शासनाने सुरू केलेल्या सिंचन योजनेचा हा फायदा असल्याचे ते म्हणाले.
पिण्याचे पाणी नेण्यास मज्जाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी शनिवारी पहाटे पाच वाजतापासून नागरिकांची गर्दी सुरू झाली. परगावातून अक्षरश: ट्रकमध्ये, मेटॅडोरमध्ये उभ्याने प्रवास करीत तर अनेक महिला पायी कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. मात्र सभास्थळ परिसरात कुठेही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आयोजकांनी केली नव्हती. कार्यक्रम संपल्यानंतर कार्यक्रमापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर पाण्याच्या कॅन ठेवल्या. त्यामुळे सभा ऐकण्यासाठी हजारो लोकांना तासन्तास भर उन्हात पाण्याविना व्याकूळ होऊन थांबावे लागले. काहींजवळ पाण्याच्या बॉटल होत्या, परंतु पोलिसांनी सुरक्षेच्या नावाखाली प्रवेशद्वारावरच त्या हिसकावून घेतल्या.
कार्यक्रमाच्या मार्गावर कागदांचा खच
प्रत्येक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना स्वच्छतेचा संदेश देतात. मात्र आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे परतीच्या वेळी रस्त्यांवर कागद आणि द्रोणांचा खच पडून होता. अनेक ठिकाणी अन्न सांडून होते. सभा ऐकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी परतीच्या मार्गावर ठिकठिकाणी मसाला भाताचे वितरण केले. सकाळपासून सभेसाठी उपस्थित असलेल्या नागरिकांनी कार्यक्रमानंतर या मसाला भाताचा आस्वाद घेतला खरा. मात्र ज्यात हा भात देण्यात आला, ते द्रोण व कागद रस्त्यावरच फेकण्यात आले. लोकांना सांडलेले अन्न तुडवत पुढे जावे लागत होते.
वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर पंचक्रोशीतील नागरिकांची गर्दी होईल. शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांचेही आवागमन होईल, याची जाणीव असतानाही या विषयात कुठलेही नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी वाहन उभे करण्यात येत होते. परिणामी वाहतुकीची कोंडी होताना दिसत होती.

कार्यक्रम शासकीय की राजकीय?
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत स्वयंसहायता समूहाच्या महिलांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. मुळात हा कार्यक्रम शासकीय असला तरी या कार्यक्रमाला राजकीय स्वरुप अधिक होते. सभास्थळाच्या चौफेर भाजपाचे झेंडे लावण्यात आले होते. विशेष म्हणजे, भाजपा वगळता इतर पक्षांच्या लोकप्रतिनिधींना वा पदाधिकाऱ्यांना फार भाव देण्यात आला नाही. गंभीर बाब ही की, पांढरकवडा शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष वैशाली नहाते यांनादेखील प्रोटोकॉलनुसार व्यासपीठावर स्थान देण्यात आले नव्हते.

मोदींच्या सभेतील क्षणचित्रे
मेळावा सुरू होण्यापूर्वी व संपल्यानंतर रस्त्यावरून नागरिकांची चिक्कार गर्दी चालत पुढे जात होती. जणू काही रस्तेच चालत असल्याचा भास यावेळी होत होता.
पंतप्रधानांसोबत व्यासपीठावर राज्यपाल विद्यासागर राव, ना. गडकरी, ना. अहीर, मुख्यमंत्री फडणवीस, ना. येरावार हेच मान्यवर होते. उर्वरित आमदार, राज्यमंत्री दर्जा असलेले वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार हेदेखील सर्वसामान्य उपस्थितांमध्ये बसून होते.

Web Title: Tribal youth heads the summit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.