४०० कोटींच्या तुरीवर व्यापाऱ्यांचा डोळा
By admin | Published: May 8, 2017 12:14 AM2017-05-08T00:14:36+5:302017-05-08T00:14:36+5:30
जिल्ह्यात सध्या तूर खरेदी सुरू आहे. मात्र टोकनवर नोंद न झालेल्या तब्बल ४०० कोटींच्या आठ लाख क्विंटलवर व्यापाऱ्यांचा डोळा आहे.
आठ लाख क्विंटल : टोकनवर नोंदणी न झाल्याने पेच, पाच वर्षात पेरा दुप्पट
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात सध्या तूर खरेदी सुरू आहे. मात्र टोकनवर नोंद न झालेल्या तब्बल ४०० कोटींच्या आठ लाख क्विंटलवर व्यापाऱ्यांचा डोळा आहे. ही तूर पडलेल्या दरात खरेदी करण्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी केली आहे.
जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत तुरीचा पेरा दुपटीने वाढला. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानामुळे ही वाढ झाली. २०११ मध्ये ९७ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा होता. २०१६ मध्ये तो एक लाख ७३ हजार ५३८ हेक्टरवर पोहोचला. यामुळे यावर्षी तुरीच्या उत्पन्नातही प्रचंड वाढ झाली. जिल्हा प्रशासनाने १५ लाख क्विंटल तुरीचे उत्पन्न होण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता. तो तंतोतंत खरा ठरला. मात्र शासनाने ही तूर खरेदी करण्यासाठी तरीही उपाययोजना केल्याच नाहीत. त्यामुळे अद्याप शेतकऱ्यांच्या ४०० कोटींची तूर पडून आहे. त्याची टोकनवर नोंदणीही झाली नाही. त्यामुळे शेतकरी पेचात सापडले आहे.
नाफेडने एक लाख ५४ हजार ५६४ क्विंटल, तर व्हीसीएमएसने ४३ हजार ४८१ क्विंटल तूर खरेदी केली. याशिवाय व्यापाऱ्यांनी दोन लाख १९ हजार ४८० क्विंटल तुरीची खरेदी केली. एकूण चार लाख १७ हजार ५२५ क्विंटल तुरीची खरेदी आत्तापर्यंत झाली आहे. टोकनवरील एक लाख ७३ हजार क्विंटल तुरीचे मोजमाप होणार आहे. एक लाख क्विंटल तुरीचा बियाणे आणि डाळीसाठी वापर होणार आहे. यानंतरही तब्बल आठ लाख क्विंटल तूर शिल्लक राहणार आहे.
सरकार व्यापाऱ्यांच्याच पाठीशी
सामान्यंना माफक दरात तूरडाळ मिळावी म्हणून राज्याने विदेशातून तूरडाळ आयात केली. यानंतर तुरीचे दर गडगडले. त्यामुळे तुरीच्या दरात घसरण झाल्याने डाळ ४० रूपयांवर येणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात झाले उलटेच आत्ताही तूरडाळ ८० रूपयांवर स्थिरावली आहे. यामुळे शासनाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेल्याचे स्पष्ट होते. यात सर्वाधिक लाभ व्यापाऱ्यांचाच झाला. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या नव्हे, तर व्यापाऱ्यांच्याच पाठीशी असल्याचे दिसून येत आहे.
तुरीचे दर घरसले आहे. मात्र बाजारात डाळीचे दर कायमच आहे. तुरीचे दर प्रती क्विंटल पाच हजार रूपये असताना डाळ ८० रूपये किलोने विकली जात होती. आता तुरीचे दर खुल्या बाजारात ३८०० रूपये असूनही तूरडाळीचे दर मात्र अद्याप कायमच आहे. त्यात किंचीतही घसरण झाली नाही.