तिहेरी हत्याकांडातील आरोपींचे ‘वेट अॅन्ड वॉच’
By Admin | Published: December 28, 2015 03:00 AM2015-12-28T03:00:00+5:302015-12-28T03:00:00+5:30
स्थानिक मच्छीपूल भागातील रविराजनगरात दुर्गोत्सवादरम्यान झालेल्या तिहेरी खून खटल्यातील आरोपींनी जामिनाच्या दृष्टीने ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमिका घेतल्याचे दिसून येते.
जामीन : पोलिसांकडून शोधमोहीम सुरूच
यवतमाळ : स्थानिक मच्छीपूल भागातील रविराजनगरात दुर्गोत्सवादरम्यान झालेल्या तिहेरी खून खटल्यातील आरोपींनी जामिनाच्या दृष्टीने ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमिका घेतल्याचे दिसून येते.
२५ आॅक्टोबर रोजी शेख इरफान शेख रमजान ऊर्फ बबलू याचा खून करण्यात आला होता. यातील आरोपींचे जामिनाचे प्रयत्न फसले. सत्र न्यायालय व उच्च न्यायालयातही त्यांना दिलासा मिळाला नाही. त्याच दिवशी मो.इकबाल मो. जब्बार व मो.जावेद ऊर्फ कालू मो. जब्बार या दोघांचा खून करण्यात आला होता. यातील फरार प्रतिष्ठित आरोपींनीसुद्धा अद्याप अटकपूर्व जामिनासाठी कोणतेही प्रयत्न चालविले नाही. ते फरार आहे. त्यांच्या शोधार्थ पोलीस पथके फिरत आहेत. दोषारोपपत्र दाखल होण्याची व विरोधी गटातील कुणाला जामीन मिळतो का याची प्रतीक्षा केली जात आहे. विरोधी गटाला जामीन मिळाल्यास त्याच आधारावर स्वत:ही जामीन मिळविण्याचा या आरोपींचा प्रयत्न राहू शकतो, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. मो.इकबाल व मो. जावेद या दुहेरी खुनाचा तपास यवतमाळचे एसडीपीओ राहुल मदने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून प्रतिष्ठित आरोपी फरार असल्याने पोलिसांवर त्यांच्या अटकेसाठी राजकीय गोटातूनही दबाव वाढत असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)