माचिसचे गठ्ठे घेऊन जाणारा भरधाव ट्रक पेटला; राष्ट्रीय महामार्गावरील खातारा गावानजीकची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2023 04:11 PM2023-09-16T16:11:00+5:302023-09-16T16:11:59+5:30
फायर ब्रिगेडलाही पाचारण करण्यात आले. परंतु तोपर्यंत ट्रकची केबिन व दोन्हीही बाजू जळून खाक झाल्या होत्या.
पांढरकवडा (यवतमाळ) : नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाने नागपूरच्या दिशेने माचिसचे गठ्ठे घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतल्यामुळे ट्रकसह ट्रकमधील माचिसचे गठ्ठे जळून भस्मतात झाले. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील खातारा-सिंगलदीप या गावादरम्यान घडली. यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
तामिळनाडूतील कोविलपट्टू येथून राष्ट्रीय महामार्गाने विविध कंपन्यांच्या माचिसच्या डब्यांचे गठ्ठे भरून टीएन४६-व्ही-६९३६ या क्रमांकाचा ट्रक हा उत्तर प्रदेशातील नेवारी या गावाकडे जात होता. दरम्यान महामार्गावरील खातारा ते सिंगलदीप या गावाच्या दरम्यान रस्त्यावर थांबून असलेल्या एका ट्रकला घासून हा भरधाव ट्रक समोर गेला. ट्रकमध्ये भरून असलेल्या माचिसच्या डब्यांचे घर्षण झाल्यामुळे ठिणग्या पडून माचिसच्या गठ्ठ्यांनी अचानक पेट घेतला. ट्रक चालक व क्लीनरच्या हे लक्षात येताच, क्लीनर ट्रक खाली उतरला व त्याने दोराने बांधून असलेले माचिस चे गठ्ठे सोडून ते गठ्ठे खाली पाडण्याचा प्रयत्न केला. या स्थितीत असलेला ट्रक पुढे काही अंतरावर नेत माचिसचे जळलेले गठ्ठे खाली पाडत हा ट्रक काही अंतर पुढे गेला.
जळत असलेले जास्तीत जास्त गठ्ठे पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही पेटलेले माचिसचे गठ्ठे खालीही पडले. परंतु ट्रकमध्ये असलेल्या उर्वरित माचीसच्या गठ्ठ्यांनीही पेट घ्यायला सुरुवात झाली. क्षणार्धात या गठ्ठ्यांनी पेट घेतला. त्याही अवस्थेत वाहनचालकाने ट्रक काही अंतरावर नेऊन रस्त्याच्या बाजूला लावला. बर्निंग ट्रकचे हे दृश्य पाहण्यासाठी खातारा गावासह आजुबाजूच्या गावातील लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच करंजी येथील महामार्ग पोलीस कर्मचारी तसेच वडकी पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय महाले आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहोचले. विस्कळीत झालेली वाहतूक त्यांनी पूर्ववत केली. दरम्यान फायर ब्रिगेडलाही पाचारण करण्यात आले. परंतु तोपर्यंत ट्रकची केबिन व दोन्हीही बाजू जळून खाक झाल्या होत्या. आगीचे लोळ टायरपर्यंत व डिझेल टॅंकपर्यंत यायला लागले होते. परंतु फायर ब्रिगेडमुळे आग तिथपर्यंत पोहोचू शकली नाही. अन्यथा डिझेल टॅंकचा स्फोट झाला असता.