किन्हाळाजवळ धावता ट्रक पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 09:42 PM2018-04-25T21:42:34+5:302018-04-25T21:42:34+5:30
पांढरकवडा मार्गावरील किन्हाळा गावाजवळ धावता ट्रक पेटल्याची घटना बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत ट्रकचा पूर्णत: कोळसा झाला. जवळपास ३ तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहदा : पांढरकवडा मार्गावरील किन्हाळा गावाजवळ धावता ट्रक पेटल्याची घटना बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत ट्रकचा पूर्णत: कोळसा झाला. जवळपास ३ तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
चंद्रपूरकडून यवतमाळकडे निघालेला ट्रक (एमएच २६ एच ८३४१) पंक्चर झाला. ब्रेक मारल्याने घासत गेलेल्या टायरने पेट घेताच संपूर्ण ट्रक बेचिराख झाला. या ट्रकद्वारे सिमेंटची वाहतूक केली जात होती. पांढरकवडा, यवतमाळहून आलेल्या अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली. करंजी महामार्ग पोलीस, वडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
घटनास्थळापासून जवळच शेतातील विहिरीवरून पाणी घेऊन ट्रक विझविण्याचा नागरिकांचा प्रयत्न होता. मात्र वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यावेळी काही लोकांनी विद्युत कंपनीशी संपर्क करून वीज सुरू करण्याची विनंती केली. मात्र कंपनीने भारनियमन सुरू असल्याचे सांगत वीज पुरवठा सुरळीत करण्यास स्पष्ट नकार दिला. विहिरीचे पाणी मिळाले असते तर ट्रक बेचिराख होण्यापासून वाचला असता, असे मत व्यक्त होत आहे.