विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करा
By admin | Published: February 6, 2016 02:44 AM2016-02-06T02:44:18+5:302016-02-06T02:44:18+5:30
अध्ययन आणि अध्यानाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडावा, याकरिता इतर बाबींचेही शिक्षण देणे आवश्यक आहे.
अशोक चिरडे : नगरपरिषद शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम
दारव्हा : अध्ययन आणि अध्यानाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडावा, याकरिता इतर बाबींचेही शिक्षण देणे आवश्यक आहे. सांस्कृतिक कार्यक्रमासारखे उपक्रम यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे असे उपक्रम अविरत राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करा, असे प्रतिपादन नगराध्यक्ष अशोक चिरडे यांनी केले.
नगरपरिषदेच्या सात शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम मराठी शाळा क्र.२ मध्ये पार पडले. यावेळी उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रामुख्याने उपाध्यक्ष माधुरी गडपायले, शिक्षण सभापती इंगोले, बांधकाम सभापती अली महमंद सोलंकी, नगरसेवक हरिभाऊ गुल्हाने, जब्बार कुरेशी, मनोहर म्हातारमारे, मो.शोएब, मुख्याधिकारी जी.एस. पवार, प्रशासन अधिकारी आर.एस. व्यवहारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर गावंडे आदी उपस्थित होते.
नगराध्यक्ष चिरडे यांनी नगरपरिषदेच्या शिक्षकांची स्तुती त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी शिक्षक दिनी एका शिक्षकाचा पुरस्कार देऊन सत्कार करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी सातही शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकनृत्य, नाटिका, देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले. प्रथम क्रमांक मराठी शाळा क्र.४, द्वितीय मराठी शाळा क्र. ३ तर तृतीय क्रमांक उर्दू शाळा क्र. ३ ने पटकाविला.
बक्षीस वितरण समारंभामध्ये विजेत्या शाळांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष अशोक चिरडे, उपाध्यक्ष माधुरी गडपायले, शिक्षण सभापती इंगोले, नगरसेवक सैयद निसार, प्रशासन अधिकारी आर.एस. व्यवहारे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
संचालन शिक्षिका कापसे व मार्कंड, प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश राठोड यांनी केले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)