तलाठ्यांना उडविण्याचा प्रयत्न

By admin | Published: November 23, 2015 02:01 AM2015-11-23T02:01:46+5:302015-11-23T02:01:46+5:30

पैनगंगा नदीतून होणारी रेती तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या तहसील पथकातील तलाठ्यांना रेती तस्करांंनी ट्रॅक्टर अंगावर घालून उडविण्याचा प्रयत्न केला.

Trying to blow up the pools | तलाठ्यांना उडविण्याचा प्रयत्न

तलाठ्यांना उडविण्याचा प्रयत्न

Next

रेती माफियांनी ट्रॅक्टर अंगावर चढविला : तीन जण जखमी, गुन्हा दाखल
उमरखेड : पैनगंगा नदीतून होणारी रेती तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या तहसील पथकातील तलाठ्यांना रेती तस्करांंनी ट्रॅक्टर अंगावर घालून उडविण्याचा प्रयत्न केला. यात तीन तलाठी जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री २ वाजताच्या सुमारास उमरखेड तालुक्यातील मानकेश्वर गावाजवळ घडली. या प्रकरणी पोलिसांनी रेती माफियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पात्रातून खुलेआम रेतीची वाहतूक सुरू आहे. दररोज ३० ते ३५ ट्रॅक्टरद्वारे घाटावरून रेतीचा उपसा होत आहे. ही तस्करी रोखण्यासाठी महसूल विभागाने एक पथक तयार केले आहे. त्यामध्ये तलाठी गजानन सुरोशे, प्रकाश माने, जे.जे. खंडेलवाल, एस.आर. थोरवे, प्रकाश कानडे यांचा समावेश आहे. पैनगंगा नदीतून तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यावरून हे सर्व मानकेश्वर येथे पोहोचले. रात्री २ वाजताच्या सुमारास त्यांनी नदी पात्रात तस्करी करणारे ट्रॅक्टर पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टरचे लाईट बंद करून या तलाठ्यांच्या अंगावर चढविण्याचा प्रयत्न केला. जीव मुठीत घेऊन तलाठी सैरावैरा पळत होते. परंंतु ट्रॅक्टरच चालक त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर जोराने आणत होते. यात तलाठी प्रकाश कानडे, जे.जे. खंडेलवाल, एस.आर. थोरवे यांना जबर दुखापत झाली. त्यांच्या हाताला व पायाला मार लागला. या तलाठ्यांनी आरडाओरडा केल्याने रात्री ओलितासाठी असलेल्या शेतकऱ्यांनी धाव घेतली. शेतकरी येत असल्याचे पाहून या ट्रॅक्टर चालकांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. त्यांच्यासोबत असलेले काही लोकही त्याच ट्रॅक्टरमधून पसार झाले. या प्रकाराने तलाठ्यांची घाबरगुंडी उडाली होती. या तलाठ्यांचा थोडक्यात जीव बचावला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या प्रकरणी तलाठी प्रकाश कानडे यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपी नयन कुद्दलवाडसह सध्या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. रेती तस्कर आणि ट्रॅक्टर चालकांचा शोध उमरखेड पोलीस घेत आहे. (शहर प्रतिनिधी)

पैनगंगेच्या पात्रात राजरोस रेती तस्करी
पैनगंगा नदीच्या पात्रातील चातारी, बोरी, तिवरंग, हातला, पळशी, साखरा, खरुस, सावळेश्वर, मानकेश्वर, तिवडी, मार्लेगाव, पिंपळगाव, बोरगाव या रेती घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत आहे. लिलाव झाला नसतानाही दररोज हजारो ब्रास रेती चोरुन नेली जात आहे.
महसूल विभागाचे अधिकारी आणि वाळू माफिया यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याची जोरदार चर्चा महसूल विभागातील कर्मचाऱ्यातच आहे. त्यामुळे रेती तस्कर कुणालाही जुमानत नाही. एवढेच नाही तर तलाठ्यांवर जीवघेणा हल्लाही करण्यापर्यंत त्याची मजल जात आहे. या तस्करांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांचा शोध घेण्याचीही गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Trying to blow up the pools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.