यवतमाळात भरपूर टॅलेंट... प्रयत्न करा, जगापुढे आणा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 09:05 PM2018-12-08T21:05:07+5:302018-12-08T21:05:40+5:30
कोणत्याही शहराची ओळख तेथील कलावंतांमुळे जगापर्यंत पोहोचते. यवतमाळात टॅलेंटची कमतरता नाही. फक्त ते टॅलेंट जगापर्यंत पाहिजे त्या प्रमाणात पोहोचत नाही.
अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोणत्याही शहराची ओळख तेथील कलावंतांमुळे जगापर्यंत पोहोचते. यवतमाळात टॅलेंटची कमतरता नाही. फक्त ते टॅलेंट जगापर्यंत पाहिजे त्या प्रमाणात पोहोचत नाही. टॅलेंट जगापुढे आणण्यास तरुण, तरुणींनी प्रयत्न वाढविले पाहिजे, असे आपुलकीचे आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते-केळकर यांनी केले.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या टीव्ही मालिकेतून लोकप्रिय झालेल्या अनिता केळकर तसेच सिनेअभिनेत्री श्रृती मराठे, प्राजक्ता माळी, अभिनेता अभिजित खांडकेकर शनिवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने यवतमाळात आले होते. यावेळी अनिता दाते यांनी ‘लोकमत’शी दिलखुलास गप्पा केल्या. मालिकेतील राधिका सुभेदार हे त्यांचे पात्र वैदर्भी भाषेतच बोलते. याबाबत विचारले असता अनिता म्हणाल्या, या मालिकेवर सुुरवातीला नागपुरातूनच टीका झाली होती. विदर्भाची अशी भाषा नाहीच, असा दावा करण्यात आला होता. मात्र आता विदर्भातील प्रेक्षकांच्या सपोर्टमुळेच मालिकेतील भाषा लोकप्रिय होत आहे. तशी ती पूर्ण वैदर्भी भाषा नाही, तिला केवळ वैदर्भी ‘फ्लेवर’ देण्याचा आम्ही प्रयत्न केला. विदर्भाशी माझा खूप आधीपासून संबंध आहे. झाडीपट्टी नाटकांची येथे समृद्ध परंपरा आहे. नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने बरेचदा विदर्भात आले. ‘ए भाऊ डोकं नको खाऊ’ हे व्यावसायिक नाटक आम्ही चंद्रपूर, ब्रह्मपुरी, यवतमाळातही केले. फक्त मालिकेमुळे गेल्या अडीच वर्षांपासून जरा नाटकांपासून दूर आहे. पण यवतमाळात, पुसदमध्ये माझे काही कलावंत मित्र आहेत. त्यांच्यामुळे यवतमाळविषयी मला फार आपलेपणा वाटतो.
प्रत्येक शहरात नाट्यगृह हवेच
व्यावसायिक नाटकांचा विषय निघालेला असतानाच यवतमाळातील अर्धवट नाट्यगृहाबाबत अनिता केळकर म्हणाल्या, यवतमाळच नव्हेतर प्रत्येक शहरात नाट्यगृह आवश्यकच आहे. जसे आपण शहराच्या आरोग्याची, शिक्षणाची काळजी घेतो, तशीच शहराची संस्कृती घडविण्यासाठी नाट्यगृह गरजेचे आहे. नाट्यगृह पूर्ण करणे ही इथल्या सत्ताधाऱ्यांची आणि नागरिकांचीही जबाबदारी आहे. नाट्यगृहावरच या शहराचा विकास अवलंबून आहे. नाट्यगृह झाल्यास वेगवेगळ्या कलावंतांना बघण्याची संधी तर मिळेलच, शिवाय स्थानिक लोकांच्या कलेलाही भरपूर वाव मिळेल. पण नाट्यगृह म्हणजे केवळ इमारत बांधू नये, ते ‘टेक्निकलीही’ परिपूर्ण असावे. यवतमाळात होऊ घातलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला येण्याची खूप इच्छा आहे. मात्र वेळेवर कसे नियोजन होते, ते बघावे लागेल.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील राधिका सुभेदार यवतमाळच्या ग्रामीण महिलांना काय संदेश देऊ इच्छिते या प्रश्नावर अनिता केळकर म्हणाल्या, कोणतीही स्त्री कमी नसते. स्त्रीने बाहेरचे जगही अनुभवले पाहिजे. पण ग्रामीण महिलांना घराबाहेर पडण्यास वाव नसेल, तर त्यांनी आपल्या घरातील, संसारातील आवडीचे काम करावे. कुटुंब सांभाळणे हे कामही सोपे नाही. महिलांनी पहिल्यांदा आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. काम कोणतेही करा, पण ते आनंदी राहण्यासाठी करा. पुरुषांनीही महिलांना कमी लेखू नये. विरोध न करणे हीसुद्धा एकप्रकारची मदतच.
लोकमत सखी मंचचा कलावंतांना ‘सपोर्ट’
अवघ्या मराठी वाचकांमध्ये ‘लोकमत’ची वेगळी ओळख आहे. ‘लोकमत सखी मंच’ने तर महिलांना खूप वाव मिळवून दिला आहे. मी मूळची नाशिकची असल्याने मला ठाऊक आहे, सांस्कृतिक कार्यक्रमांना, चळवळींना लोकमत नेहमी सपोर्ट करते. लोकमतच्या माध्यमातून नेहमी विविध स्पर्धा होत असतात. त्यामाध्यमातून सांस्कृतिक क्षेत्राला नवी दिशा मिळत असते, असे गौरवोद्गार अनिता केळकर यांनी काढले.