रेती घाटावर तुंबळ हाणामारी; वाहनांची तोडफोड, हवेत गोळीबार
By विशाल सोनटक्के | Published: March 29, 2024 06:12 PM2024-03-29T18:12:16+5:302024-03-29T18:12:25+5:30
चार आरोपी अटकेत : मुख्य आरोपीच्या शोधासाठी पाच पथके रवाना
यवतमाळ : महागाव तालुक्यातील भोसा रेती घाटावर वर्चस्ववादातून गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. अनेक जण जखमी झाले असून हवेत गोळीबार झाल्यामुळे परिसर हादरला. घटनास्थळी २० ते २५ राउंड फायर झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून चार राउंड रिकामे, तर दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपीसह २० ते २५ आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
महागाव तालुक्यातील भोसा व आर्णी तालुक्यातील साकुर घाटाच्या रस्त्यावरून रेती उपसा आणि वाहतुकीच्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. रात्रीच्या अंधारात हवेत गोळीबार करण्यात आला. मुख्य आरोपी अंजुम लाला यांनी फिर्यादीला घटनास्थळावर दमदाटी करून मारहाण केली व त्यांच्या दिशेने राउंड फायर केल्याची फिर्याद सुरेश ऊर्फ कृष्णा ढाले यांनी महागाव पोलिसांत दाखल केली. या फिर्यादीवरून अंजूम लाला व २० ते २५ जणांविरुद्ध पोलिसांनी शुक्रवारी पहाटे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. घटनास्थळावरून एक कार, सहा मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्या. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर घटना घडल्यानंतरही स्थानिक प्रभारी पोलिस अधिकारी घटनास्थळावर उपस्थित नसल्यामुळे जगताप यांनी संताप व्यक्त केल्याची माहिती आहे.
महागाव येथील सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद सरकाटे हे रात्री १२ वाजता कर्मचाऱ्यांसह पोहोचले होते. उमरखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड रात्रीपासूनच घटनास्थळी ठाण मांडून आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व आरोपींच्या शोधासाठी पाच पथके तयार केली. आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार आरोपींना रात्रीच अटक केली आहे. भादंवि कलम ३०७, ३२४, ३४१, १४३, १४४, १४६, १४७, १४९ सह कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलिस अधिनियम १३५ नुसार आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्थानिक प्रशासनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी
शासन आणि उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशाची पायमल्ली करून येथे रेतीच्या व्यवसाय सुरू आहे. त्यातील स्पर्धेकडे स्थानिक तहसील दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलेल्या आहेत. महसूल प्रशासन या घटनेवर मात्र चुप्पी साधून बसले आहे. तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थानिक पोलिस प्रशासनाच्या व महसूल प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्यामुळे जनतेमधून संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय नेतृत्व कमी पडत असल्याने जनतेमध्ये सत्ताधाऱ्याविरुद्ध नाराजी पसरली आहे.