गुप्तधनासाठी भुयार खोदले पण जमिनीचा ढाचा कोसळून एकाचा मृत्यू
By विशाल सोनटक्के | Published: October 4, 2023 06:46 PM2023-10-04T18:46:43+5:302023-10-04T18:47:44+5:30
एक महिन्यानंतर मृत्यूप्रकरणाचा छडा : दारव्हा येथील प्रकरणात तिघांना अटक
यवतमाळ : दारव्हा येथे ६ सप्टेंबर रोजी एका इसमाचा मृतदेह विहिरीत मृत अवस्थेत आढळून आला होता. सदर इसमास चांगले पोहता येत होते. त्यामुळे विहिरीत बुडून त्यांचा मृत्यू कसा काय होवू शकतो, हा प्रकार घातपाताचा असावा, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला होता. अखेर महिन्याभरानंतर या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. गुप्तधन काढण्याच्या लालसेतून भुयार खोदत असताना जमिनीचा ढाचा अंगावर कोसळून सदर इसमाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील इतरांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मयताचे प्रेत विहिरीत टाकल्याचे उघड झाले. आता या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.
दारव्हा पोलिस ठाण्यात ६ सप्टेंबर रोजी देवराव रामजी बटुकले (५२, रा. शिवाजी चौक, दारव्हा) यांचे प्रेत शेतातील विहिरीत आढळल्याची तक्रार बटुकले यांच्या पत्नीने दिली होती. त्यावरून पोलिसांनी कलम १७४ सीआरपीसी प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद घेवून प्रकरणाचा तपास सुरू केला. नातेवाईकांचे बयाण नोंदविले असता त्यांनी मृतकाच्या मरणाबाबत संशय व्यक्त केला. देवराव यांना चांगले पोहता येत होते. त्यामुळे त्यांचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू होवू शकत नाही. यामागे घातपात असावा, अशी शंका त्यांनी बयाणामध्ये नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक पद्धतीने तपास सुरू केला. या प्रकरणात प्रशांत विठोबा चिरडे व गंगाधर किसन नेवारे या दारव्ह्यातील दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली असता, चिरडे यांनी देवराव यांच्या मृत्यूची कहाणी कथन केली.
कारंजा लाड येथील विनेश कारिया यांचे अतिशय जुने घर आहे. २ सप्टेंबर रोजी गुप्तधन काढण्याच्या लालसेतून गंगाधर नेवारे व मृतक देवराव रामजी बटुकले हे तेथे खोदकाम करीत होते. तर प्रशांत चिरडे व विनेश रामजीभाई कारिया हे दोघे तेथे हजर होते. सुमारे आठ फुटांच्या खोल खड्ड्यात आडवे दहा फुटांचे भुयार खोदण्यात आले. मात्र, त्याचवेळी वरील जमिनीचा ढाचा काेसळून त्यात देवराव बटुकले यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर तेथे उपस्थित तिघांनी देवराव याचे प्रेत दारव्हा शिवारातील विहिरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
या माहितीनंतर पोलिसांनी प्रशांत विठोबा चिरडे, गंगाधर किसन नेवारे व विनेश रामजीभाई कारिया या तिघांना भादंवि कलम ३०४, २०१ सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा २०१३ च्या कलम ३ (क) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली. या प्रकरणाचा तपास दारव्हा पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे केला. पोलिस निरीक्षक विलास कुलकर्णी, सहायक पोलिस निरीक्षक गणेश वनारे यांनी गुन्हा उघडकीस आणला.