मार्च एन्डला तूर उसळली; हरभराही भाव खाणार!

By रूपेश उत्तरवार | Published: March 28, 2023 02:17 PM2023-03-28T14:17:35+5:302023-03-28T14:18:00+5:30

परराज्यात उत्पादन घटीचा परिणाम

tur dal price increase at march end, gram prices also be rise | मार्च एन्डला तूर उसळली; हरभराही भाव खाणार!

मार्च एन्डला तूर उसळली; हरभराही भाव खाणार!

googlenewsNext

यवतमाळ : साधारणता मार्च एंडिंगला शेतमालाचे दर प्रचंड दबावात असतात, परंतु यंदा तूर आणि हरभऱ्याच्या दरात याविषयी विरोधाभासी चित्र पाहायला मिळाले. मार्च एंडिंग असताना तूर आणि हरभऱ्याच्या दरात मोठी सुधारणा झाली. एकाच दिवसी क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. यामुळे सारेच अवाक् झाले आहेत. याचा फायदा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या घरात तूर आणि हरभराच राहिला नाही, अशी स्थिती आहे.

गतवर्षीच्या हंगामात तुरीचे उत्पादन कमालीचे घटले. राज्यासह मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तूर व हरभरा उत्पादनाला मोठा फटका बसला. विदेशातही तुरीचे उत्पादन कमी आहे. यानंतरही देशात तुरीची आयात करण्याचा निर्णय झाला. यामुळे तुरीचे दर दबावात होते. सध्या तुरीला ६,३०० रुपये क्विंटलचे दर आहेत. खुल्या बाजारात तुरीला ८,००० ते ८,५०० रुपये क्विंटलपर्यंतचे दर होते. सोमवारी हे दर ८,५०० ते ९,००० रुपये क्विंटलपर्यंत वर चढले. मे, जून महिन्यात तुरीचे दर वाढतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज होता. मात्र, मार्च एंडलाच दर वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

त्याचप्रमाणे, हरभऱ्याच्या उत्पादनाही राज्यासह इतर ठिकाणी उत्पादन घटले आहे. त्याचे पडसाद बाजारपेठेवर झाला आहे. ४,००० ते ४,४०० रुपये क्विंटलपर्यंत असलेला हरभरा ४,८०० रुपये ते ४,९०० रुपये क्विंटलपर्यंत वर चढले आहेत. हरभऱ्याला ५३३५ रूपये क्विंटलचा हमी दर आहे. हमी केंद्राला प्रारंभ होताच हरभऱ्याच्या दरात सुधारणा झाली. पुढील काळात हरभऱ्याच्या हमीदरापेक्षा जास्त दर मिळण्याची शक्यता व्यापारी गटातून वर्तविली जात आहे.

सरकारी धाेरणाने दर पडण्याचा धोका

ज्यावेळी शेतमालाचे दर वाढतात, त्याच वेळी त्याचे दर पाडण्यासाठी सरकारकडून प्रयत्न हाेतो. शेतमालाचे दर अचानक वाढल्याने डाळीची आयात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे वाढीव दर किती दिवस राहणार हे सांगणे अवघड आहे. तूर्त काही दिवस शेतमालाच्या दरात तेजी राहण्याची शक्यता आहे.

कापूस आणि सोयाबीन दरात घसरण

कापसाच्या दरात दिवसेंदिवस घट नोंदविली जात आहे. ७,२०० ते ७,६५० रुपये क्विंटलपर्यंत कापसाचे दर खाली आले आहेत. सोयाबीनचे दर अशाच पद्धतीने घटले आहे. ४,८०० ते ५,००० रुपये क्विंटलपर्यंत या दरात घसरण झाली आहे.

राज्यासह इतर ठिकाणी तुरीचे उत्पादन घटले आहे. याशिवाय हमी केंद्र सुरू झाले आहे. या दोन्ही घडामोडीमुळे बाजारात तूर आणि हरभऱ्याच्या दरात वाढ झाली. या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होईल.

- सुधीर कोठारी, हिंगणघाट बाजार समिती.

Web Title: tur dal price increase at march end, gram prices also be rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.