नेर बाजार समितीत तूर सडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 11:32 PM2018-06-29T23:32:12+5:302018-06-29T23:33:20+5:30
‘एसएमएस’द्वारे खरेदीसाठी बोलाविलेली हजारो क्विंटल तूर येथील बाजार समितीत पडून आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचा माल सडत आहे. तूर सुरक्षित राहावी यासाठी उपाययोजना करण्यात आल्या नाही. यात मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : ‘एसएमएस’द्वारे खरेदीसाठी बोलाविलेली हजारो क्विंटल तूर येथील बाजार समितीत पडून आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचा माल सडत आहे. तूर सुरक्षित राहावी यासाठी उपाययोजना करण्यात आल्या नाही. यात मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
नाफेडच्या सूचनेनुसार तालुक्यातील ४०० शेतकऱ्यांना बाजार समितीने तूर घेऊन बोलाविले. बारदाणा संपल्याने खरेदी थांबविण्यात आली. १५ मे रोजी नाफेडने खरेदी कायमस्वरूपी बंद केली. शिल्लक राहिलेली तूर बाजार समितीच्या आवारात ठेवली. ही तूर सुरक्षित राहावी यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या नाही. पावसामुळे भिजलेली बरीच तूर सडली. बाजार समितीचे सभापती रवींद्र राऊत यांच्याकडे शेतकऱ्यांनी हा प्रश्न मांडला. प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न केले जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुनील खाडे यांनीही हा प्रश्न लाऊन धरला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याची मागणी केली.
महिलेचा आकांत
रक्षित सावला यांच्या मालकीची तूर नेर बाजार समितीत ठेवली होती. त्यांनी आपला गडी राजेंद्र गंधे यांच्यामार्फत ही तूर पाठविली होती. शुक्रवारी या तुरीची पाहणी करण्यासाठी राजेंद्रची बहीण बाजार समितीत आली. त्यावेळी तिला तूर सडलेली दिसली. त्यामुळे या महिलेने याठिकाणी आकांत केला. तुरीची भरपाई मागितल्यास भाऊ देणार कुठून या विवंचनेतून तिने सभापती रवींद्र राऊत यांच्याकडे तिने हा प्रश्न मांडला. नुकसान भरपाईची मागणी केली.