दोन महिन्यांत तूर चार हजारांनी घसरली; शेतकऱ्यांची होरपळ : कर्नाटकसह विदेशातील दराचा थेट परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 07:25 IST2025-02-18T07:23:00+5:302025-02-18T07:25:21+5:30

याचा परिणाम राज्यातील बाजारावर झाला आहे. दोन महिन्यांत तुरीचे दर क्विंटलमागे तब्बल चार हजारांनी घसरले आहेत.

Turmeric price drops by 4,000 in two months; Farmers in panic: Direct impact of prices abroad including Karnataka | दोन महिन्यांत तूर चार हजारांनी घसरली; शेतकऱ्यांची होरपळ : कर्नाटकसह विदेशातील दराचा थेट परिणाम

दोन महिन्यांत तूर चार हजारांनी घसरली; शेतकऱ्यांची होरपळ : कर्नाटकसह विदेशातील दराचा थेट परिणाम

रूपेश उत्तरवार

यवतमाळ :  यवतमाळातील तूरडाळीला मोठी मागणी आहे. इतकेच नव्हे तर राज्यातील तूरही  देशभरात मोठ्या प्रमाणात खरेदी होते. याशिवाय तुरीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली. प्रत्यक्षात विदेशातून तूरडाळ आयात सुरू झाली. याचवेळी कर्नाटकातही तुरीचे उत्पादन वाढले आहे. याचा परिणाम राज्यातील बाजारावर झाला आहे. दोन महिन्यांत तुरीचे दर क्विंटलमागे तब्बल चार हजारांनी घसरले आहेत.

 राज्यभरात १२ लाख हेक्टरपर्यंत तुरीची लागवड झाली. गतवर्षीपेक्षा यावर्षी तुरीचे लागवड क्षेत्र वाढले आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील लागवड क्षेत्र सव्वालाख हेक्टरपर्यंत पोहचले आहे. तर विदर्भाचे लागवड क्षेत्र पाच लाख हेक्टरपर्यंत गेले आहे. मिश्र पीक म्हणून शेतकऱ्यांनी तुरीची लागवड केली. तर काही ठिकाणी सरसकट तुरीची पेरणी  केली. दर चांगले मिळतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र योग्य भावाअभावी उत्पादन खर्चही निघतो की नाही अशी चिंता व्यक्त होत आहे.

असे घसरले तुरीचे दर

२०२४ मध्ये एप्रिलपासून तुरीच्या दरात सुधारणा झाली होती. आठ ते नऊ हजार रूपये क्विंटलची तूर नोव्हेंबर महिन्यात १२ हजार रूपये क्विंटलपर्यंत पोहचली होती.

मात्र डिसेंबर अखेरच्या आठवड्यापासून दरात घसरण सुरू झाली.

१२ हजारांवरून तूर आता ६५०० ते ७३०० रूपयांपर्यंत खाली आली आहे.

कर्नाटकात ४५० रुपये बोनस

जानेवारीत कर्नाटकमधील तूर बाजारात आली. याचवेळी दर पडण्यास सुरूवात झाली. त्यामुळे कर्नाटक सरकारने हमी दरासोबत ४५० रुपयांचा बोनस दिला. त्यामुळे तेथील शेतकऱ्याला आठ हजारांचा दर मिळाला आहे.

हमी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा

यंदा तुरीला पावसाचा फटका बसला. राज्य शासनाने १२ लाख टन तूर उत्पादन होणार असल्याने हमी केंद्रावर दोन लाख ९७ हजार टन खरेदीचे नियोजन केले. हे हमी केंद्र सुरू व्हायचे आहे. याचवेळी खुल्या बाजारात दर पडले. तुरीचा हमीभाव ७५५० रुपयांचा आहे.

Web Title: Turmeric price drops by 4,000 in two months; Farmers in panic: Direct impact of prices abroad including Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.