शेतकरी गटाने उभा केला हळद प्रक्रिया उद्योग
By Admin | Published: March 20, 2017 12:28 AM2017-03-20T00:28:01+5:302017-03-20T00:28:01+5:30
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून एखाद्या गावातील शेतकरी एकत्र येऊन प्रक्रिया उद्योग उभारू शकतात, यावर विश्वास बसणार नाही.
महागावची गरुड भरारी : प्रक्रिया उद्योगातून साधली ‘अस्सल हळदी’च्या व्यवसायात प्रगती
महागाव : शेतीला पूरक व्यवसाय म्हणून एखाद्या गावातील शेतकरी एकत्र येऊन प्रक्रिया उद्योग उभारू शकतात, यावर विश्वास बसणार नाही. परंतु हे वास्तव प्रत्यक्षात उतरविले ते मुडाणा येथील शेतकरी पुरुष गटाने. त्यांनी हळदीवर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू करून एक प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे.
महागाव तालुक्यातील मुडाणा हे शेतीप्रधान असलेले गाव. या ठिकाणी प्रयोगशील शेतकरी अनेक आहे. जिल्ह्यात सर्वाधिक हळदीचे उत्पादन याच परिसरात घेतले जाते. परंतु केवळ उत्पादन घेण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करणारा उद्योग जर उभारला तर व्यवसायात आणखी झपाट्याने वाढ होऊ शकते. या संकल्पनेतून येथील प्रयोगशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हळद प्रक्रिया उद्योग सुरू केला. तत्पूर्वी त्यांनी पुरुष गटाची स्थापना केली. या उद्योगासाठी त्यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. आत्माचे अमोल भैसवार यांनी शेतकऱ्यांना हळदीवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाची कल्पना दिली. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
गटातील तेराही शेतकऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण करून आपल्या शेतात हळद पिकावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारला. स्वावलंबी हळद उत्पादन शेतकरी बचत गट या नावाने त्याची नोंदणी केली. या बचत गटाचे अध्यक्ष राजू भिमटे, उपाध्यक्ष गजानन भिमटे, सचिव शोभा माटाळकर, छाया भिमटे, समाधान भिमटे, दुलाजी भिमटे, तानाजी ठाकरे, विठ्ठल भिमटे, रमेश, मनकर्णा, बाळू भिमटे, आशीष माटाळकर व अमर भिमटे आदी १३ शेतकऱ्यांनी एकत्र येवून २४ नोव्हेंबर २०१४ रोजी पुरुष गटाची स्थापना केली. यातील प्रत्येक शेतकऱ्याकडे दोन-तीन एकर म्हणजेच एकूण ३५ एकर हळदीचे क्षेत्र आहे. त्यामुळे या सर्व हळद उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येवून त्यावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारला. त्याला लागणारे साहित्य सुरुवातीला शासन आणि बँकेकडून मिळविण्यासाठी उंबरठे झिजविले. परंतु शासनस्तरावरही अधिकाऱ्यांचे अनुभव फारसे चांगले राहिले नाही. फाईल सरकविण्यासाठी पैशाची मागणी होत असल्याचे लक्षात येताच या शेतकऱ्यांनी स्वत:च आपल्या उद्योगात शक्य ती गुंतवणूक करण्याचे ठरविले. साधारणत: तीन ते चार लाख रुपये खर्च करून अहमदाबाद येथून हळद काढण्याची मशीन आणली. मुडाणा येथील शेतातच मशीन बसविण्यात आली. त्यानंतर हळद काढण्याचे काम जोमाने सुरू करण्यात आले. शेतकरी एकत्र येवून एखादा उद्योग सुरू करतात, ही संकल्पना आपल्या जिल्ह्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. परंतु हे सिद्ध करून दाखविले मुडाणा येथील शेतकऱ्यांनी. वीज मंडळाने त्यांच्या उद्योगासाठी स्वतंत्र डीपी देण्यासाठी तब्बल एक वर्ष त्यांना फिरविले. जून महिन्यात लागण केल्यानंतर फेब्रुवारी ते मार्च महिन्यात काढणी केल्या जाते. एकरी १५० ते २०० क्विंटल उत्पादन काढल्या जात असून त्यावर प्रक्रिया केलेल्या मालाचा मागणीनुसार पुरवठा केला जातो. हळद पिकाला सांगली, हिंगोली, वसमत व नांदेड या ठिकाणी चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे. तयार हळद गरजेनुसार बाजारात ‘अस्सल महागाव’ या नावाने विकल्या जात आहे. या हळदीची पॅकिंगही घरच्याच महिला करीत असून त्यांनाही घर बसल्या रोजगार मिळाला आहे. शासनाला जर आम्हाला हळद पुरविण्याचा कंत्राट दिला तर चांगले उत्पादन काढता येवून आमच्या व्यवसायात भरभराटी येवू शकते, असे मत या शेतकऱ्यांनी व्यक्त केले. शेतकरी आत्महत्याग्रस्त तालुका म्हणून कुरवाळत बसण्यापेक्षा अशा प्रकारे शेतीच्या पूरक उत्पादनाच्या उद्योगात विविध गावचे अनेक गरजू शेतकरी आपले परिश्रम कामी लावून चांगली आर्थिक कमाई करू शकतात. हे या बचत गटाने दाखवून दिले आहे. (शहर प्रतिनिधी)