यवतमाळ-चंद्रपूर सीमावर्ती भागातील अवैध धंदे बंद करा
By admin | Published: July 18, 2016 12:55 AM2016-07-18T00:55:27+5:302016-07-18T00:55:27+5:30
यवतमाळ व चंद्रपूर जिल्हा सीमेलगतच्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे तथा वाहतूक फोफावली आहे.
हंसराज अहीर : वेकोलि, पोलीस, परिवहन, उत्पादन शुल्क विभागाला निर्देश
यवतमाळ : यवतमाळ व चंद्रपूर जिल्हा सीमेलगतच्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे तथा वाहतूक फोफावली आहे. यामुळे अनेक अनुचित प्रकार वारंवार घडतात. या सर्व अवैध धंद्यांवर तातडीने निर्बंध घालण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. यासाठी वेकोलि, पोलीस, परिवहन व उत्पादन शुल्क विभागास ठराविक काळाचा अल्टिमेटमही त्यांनी दिला.
दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेलगत भागामध्ये फोफावलेल्या अवैध धंद्यांना आवर घालण्यासाठी कायदा व सुवस्थेबाबतची संयुक्त बैठक घुग्गुस येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला चंद्रपूरचे आमदार नाना शामकुळे, राजूरचे आमदार संजय धोटे, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आर्णीचे आमदार राजू तोडसाम, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सभापती देवराव भोंगळे, यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक राजीवरंजन मिश्र यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, उत्पादन शुल्कचे अधीक्षक, संबंधित भागाचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.
वेकोलिच्या कोळसा वाहतुकीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. सदर कोळसा सरसकट अवैधपणे वाहतूक केला जातो. अनेक ठिकाणी अवैधपणे कोलडेपो चालविले जातात. यावर नियंत्रण नाही, याबाबत गृहराज्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत या सर्व बाबींवर महिनाभरात प्रतिबंध घालण्याचे निर्देश दिले. कोळशाची अवैध वाहतूक किंवा साठा आढळून आल्यास तत्काळ कार्यवाही केली जावी. वकोलि परिसरातील अवैध वाहतूक व धंद्यांवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्यासोबतच परिसरात फिरणाऱ्या सर्व वाहनांचे जीपीएस, जीपीआरएसद्वारे नियंत्रण करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य महाप्रबंधकांना दिले.
दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेलगत मोठ्या प्रमाणावर राज्याबाहेरील वाहनांची वर्दळ आहे. या वाहनांचे परवाने आहेत का? वाहनांवर काम करणाऱ्या मजुरांची वर्तवणूक कशी आहे, या बाबींवर बारकाईने लक्ष केंद्रित केले जावे. सातत्याने नियमांचा भंग करून वाहतूक केली जात असल्यास वाहनांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या सर्व बाबींच्या सुधारणेसाठी ठरावीक काळाचा अल्टिमेटमही अहीर यांनी सर्व संबंधित विभागांना बैठकीत दिला.
(स्थानिक प्रतिनिधी)
दारूच्या बाटल्यांवर बारकोड करा
दोन जिल्ह्यांच्या सीमेलगत अवैध मद्यविक्री केली जात आहे. तसेच जनावरांची अवैध वाहतूक व तस्करीही मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही वाहतूक थांबविण्यासाठी पोलीस व परिवहन विभागाने संयुक्त कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. वणी येथील मद्य बंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला पुरविले जाते. हा पुरवठा होऊ नये म्हणून मद्यांच्या बाटल्यांवर बारकोड करण्यात यावे. यामुळे कोणत्या दुकानातील माल चंद्रपूरला पुरविण्यात आला, याचा शोध घेणे शक्य होणार आहे. अवैध वाहतुकीवर पायबंद घालण्यासाठी ठिकठिकाणी तपासणी नाके निर्माण करण्यासोबतच सतत धाडसत्र सुरू ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले.