पारंपरिक पिकांऐवजी इतर पिकांकडे वळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:55 PM2019-03-01T23:55:03+5:302019-03-01T23:57:32+5:30
पारंपारिक पिकांसोबतच आता शेतकऱ्यांनी लसूण, मिरची, कांदा, ओवा, सोप, धने यासारखी पिके घेऊन अधिक उत्पन्न मिळवावे, असे आवाहन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : पारंपारिक पिकांसोबतच आता शेतकऱ्यांनी लसूण, मिरची, कांदा, ओवा, सोप, धने यासारखी पिके घेऊन अधिक उत्पन्न मिळवावे, असे आवाहन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी केले.
तालुक्यातील अंबोडा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अंबोडा येथे राष्ट्रीय मसाला पिके व सुपारी संचलनालय कालिकत (केरळ) अंतर्गत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मिरची व भाजीपाला संशोधन केंद्रातर्फे व पैनगंगा अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या सहकार्याने मसाला बियाणे, पिके आधुनिक लावगड तंत्रज्ञान प्रशिक्षण दिन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ.भाले यांच्यासह ईतरही अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
डॉ.खर्चे यांनी मसाला, भाजीपाला पिके, मिरची, लसूण, कांदा, ओवा, सोप व धने यांचे विद्यापीठाद्वारा विकसित बियाण्यांचा विदर्भातील शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. शेतकºयांनी शेतमाल थेट विकू नये. त्यावर प्रक्रिया करून तो कसा विकता येईल, यासाठी प्रयत्न करावा, असेही सांगितले. यासाठी विद्यापीठाचे मार्गदर्शन घ्यावे, असे त्यांनी सांगितले. कांदा, लसूण, हळद, ओवा, सोप यावर डॉ.डी.टी. देशमुख, प्रा.व्ही.डी. मोहोड, डॉ.एम.एन. इंगोले आदींनी सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक मिरची व भाजिपाला संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. एस.एम. घावडे यांनी केले. पैनगंगा अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष माधव राऊत यांनी आयोजन केले. संचालन डी.एस. फड यांनी केले.
राज्य पुरस्कार प्राप्त अशोक वानखेडे, सरपंच देवानंद राठोड, विलास राऊत, रामराव राऊत, मनोहर महाजन, ऊमेश आचमवार, गुणवंत राऊत, विकास खडसे, संतोष चौधरी, पुंडलिक गावंडे, सुनील कातकीडे, प्रफुल बघेल, नीलेश आचमवार, दिलीप ठाकरे, संजय काषेटवार यांच्यासह अंबोडा, कोसदनी, साकूर, दोनवाडा, लोणबेहळ, शेलू, शेंदूरसनी, आर्णीचे शेतकरी उपस्थित होते. आभार कनिष्ठ संशोधन सहाय्यक अभिलाषा खारकर यांनी मानले.