पूल खचल्याने बंदी भागातील एसटी बंद
By admin | Published: July 16, 2016 02:46 AM2016-07-16T02:46:27+5:302016-07-16T02:46:27+5:30
कायम उपेक्षिताचे जीणे नशिबी असलेल्या बंदी भागातील नागरिकांच्या समस्यांत संततधार पावसाने वाढ केली. ..
सोनदाभीचा संपर्क तुटला : १५ किलोमीटरची करावी लागते पायपीट
अविनाश खंदारे उमरखेड
कायम उपेक्षिताचे जीणे नशिबी असलेल्या बंदी भागातील नागरिकांच्या समस्यांत संततधार पावसाने वाढ केली. तालुक्यातील सोनदाभी गावाजवळील पूल खचला. परिणामी या परिसरातील नागरिकांचा तालुक्याशी संपर्क तुटला. एसटी महामंडळाने आपली सेवाही बंद केली. परिणामी नागरिकांना १५ किलोमीटरची पायपीट करावी लागते.
उमरखेड तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग म्हणजे बंदी भाग होय. मुलभूत सुविधाही येथे उपलब्ध नाही. त्यातच पावसाळ म्हटले की, या परिसरातील नागरिकांच्या अंगावर काटा उभा राहतो. वनविभागाच्या जाचक अटींमुळे रस्त्यांची दुरूस्ती होत नाही. पावसाळ््यात रस्त्यावरून चालणे कठीण होते. अनेक ठिकाणचे पूल खिळखिळे झाले आहेत. गत आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने बंदी भागात कहर केला. सोनदाभी येथील नाल्याच्या पुराने पूल खचला. परिणामी परोटी, गाडी, बोरी, जवराळा, मोरचंडी, सोनदाभी, थेरडी या गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला. राज्य परिवहन महामंडळाची बसही बंद झाली. ७ जुलैपासून या परिसरातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. उमरखेड येथे येण्यासाठी या भागातील नागरिकांना १५ किलोमीटरपर्यंत जेवलीपर्यंत चालत यावे लागते. त्यानंतर तेथून बस पकडून उमरखेड गाठावे लागते. परतीचा प्रवास तर त्याहीपेक्षा धोकादायक आहे. अभयारण्यातील वन्यप्राणी हल्ला करण्याची भीती कायमची असते. अनेक जण जीव मुठीत घेऊन रस्ता पार करता. या पुलाची डागडुजी तात्काळ करावी अशी मागणी बंदी भागातील नागरिकांची आहे.