साडेबारा लाख भाविकांनी बनविले महावस्त्र, ‘दो धागे श्रीराम के नाम’ उपक्रम
By रूपेश उत्तरवार | Published: January 20, 2024 11:57 AM2024-01-20T11:57:17+5:302024-01-20T11:57:34+5:30
यवतमाळच्या सोनालीने बनविला रामचंद्राचा पोषाख
यवतमाळ : अयोध्येतील प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला परिधान केला जाणारा कपडा १२ लाख ३६ हजार २०० भाविकांनी हातमागावर बनविला आहे. रेशमापासून १३ दिवसांत हे कापड तयार झाले आहे. पुण्यात हे महाकापड सात रंगांचे बनविण्यात आले. विशेष म्हणजे या कापडावरून यवतमाळातील सोनाली खेडेकर या डिझायनरने ९ कारागिरांच्या मदतीने पुण्यात पोषाख तयार केला असून हे वस्त्र १६ जानेवारीला श्रीरामजन्मभूमी न्यासाकडे सुपूर्द करण्यात आले.
यवतमाळमधील सेवानिवृत्त कृषी अधिकारी गिरीधर नागपुरे आणि प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या ज्येष्ठ सदस्या पुष्पा नागपुरे यांची कन्या सोनाली खेडेकर यांचे पुण्यामध्ये बुटीक आहे. साडेबारा लाख लोकांनी मिळून हातमागावर बनविलेले कापड पुण्यातील अनघा घैसास यांनी सोनाली खेडेकर यांना दिले.
रासायनिक रंग नाही, असा आहे पाेषाख
सोनाली यांनी त्यांच्याकडील नऊ कारागिरांच्या मदतीने प्रभू रामचंद्रासाठी अंगरखा, उपरणे आणि धोती असा पोषाख तयार केला.
विशेष म्हणजे, या पोषाखावर एम्ब्रॉयडरी, काशिदाकरी, मोतीकाम आणि इतर कलाकुसर साकारण्यात आली आहे.
वेगवेगळ्या प्रकारचे सात पोषाख बनविण्यात आले आहेत. भगवा, केशरी, लाल, हिरवा, पिवळा, जांभळा, निळा हे रंग वापरून ऋग्वेदातील शास्त्रानुसार हे महावस्त्र तयार केले आहे. त्यात कुठलाही केमिकल रंग नाही.
श्रीराम जन्मभूमी न्यास कार्यालयाने महावस्त्र बनविण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली होती. त्यावर आम्ही दीड वर्षापासून काम करीत आहोत. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना हा पोशाख सुपुर्द करण्यात आला.
- अनघा घैसास,
सौदामिनी हँडलुम संचालिका, पुणे