बारावीत उमरखेडची गार्गी अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 10:33 PM2018-05-30T22:33:01+5:302018-05-30T22:34:34+5:30

बारावीच्या परीक्षेत उमरखेड येथील गो.सी. गावंडे महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेची विद्यार्थिनी गार्गी आनंद तेला ही ९५.७० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल आली आहे. तिने ६५० पैकी ६२२ गुण मिळविले आहे. जिल्ह्याचा निकाल ८५.६५ टक्के लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली. तर ३२ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.

Twelveth Umarkhed Gargi tops | बारावीत उमरखेडची गार्गी अव्वल

बारावीत उमरखेडची गार्गी अव्वल

Next
ठळक मुद्देयंदाही मुलींचीच बाजी : जिल्ह्याचा निकाल ८५.६५ टक्केविज्ञान ९५.४७ टक्के कला ७९.२२ टक्के  वाणिज्य ९२.४३ टक्केविज्ञान शाखेत अ‍ॅग्लो हिंदी हायस्कूलचा निखील महाले व वाणिज्य शाखेत जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलचा सुश्राव्य पातूरकर दुसरा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बारावीच्या परीक्षेत उमरखेड येथील गो.सी. गावंडे महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेची विद्यार्थिनी गार्गी आनंद तेला ही ९५.७० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल आली आहे. तिने ६५० पैकी ६२२ गुण मिळविले आहे. जिल्ह्याचा निकाल ८५.६५ टक्के लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली. तर ३२ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
येथील अ‍ॅग्लो हिंदी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा विद्यार्थी निखील सुरेश महल्ले याने ९४.३० टक्के गुण मिळविले आहे. त्याला न्युक्लिअर अभियंता व्हायचे आहे. ‘लोकमत’ला सायंकाळपर्यंत प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेला ३१ हजार ७५८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २७ हजार २०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल ९५.४७ टक्के लागला. विज्ञान शाखेतून दहा हजार ५३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी दहा हजार ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्य श्रेणीत ६९२, प्रथम श्रेणीत चार हजार १३२, द्वितीय श्रेणीत पाच हजार १५ आणि पास श्रेणीत २२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेचा निकाल ७९.२२ टक्के लागला असून जिल्ह्यातील १७ हजार ४२३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १३ हजार ८०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्य श्रेणीत ६३१, प्रथम श्रेणीत पाच हजार ७०५ आणि द्वितीय श्रेणीत सहा हजार ९४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचा निकाल ९२.४३ टक्के लागला असून दोन हजार ६४२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी दोन हजार ४४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्य श्रेणी ४०५, प्रथम श्रेणीत एक हजार १०१ आणि द्वितीय श्रेणीत ८५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्होकेशनल शाखेचा निकाल ७७.५१ टक्के लागला आहे. या शाखेतून ११५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ८९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्य श्रेणीत २७, प्रथम श्रेणी ४०३ आणि द्वितीय श्रेणीत ४६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
बारावीच्या परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचे दिसत आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.२९ टक्के तर ८२.५४ टक्के मुले उत्तीर्ण झाले. या परीक्षेला १४ हजार ६१४ मुली बसल्या होत्या. त्यापैकी १३ हजार ४९ मुली उत्तीर्ण झाल्या. तर १७ हजार १४४ मुलांपैकी १४ हजार १५१ मुले उत्तीर्ण झाले. गत काही वर्षांपासून परीक्षांमध्ये मुली बाजी मारत असल्याचे दिसत असून यंदाही मुलींनी यशाची ही परंपरा कायम राखली आहे.
जिल्ह्यात उमरखेड अव्वल
बारावीच्या परीक्षेचा उमरखेड तालुक्याचा सर्वाधिक निकाल लागला असून या तालुक्यातून ९२.६८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्या खालोखाल दिग्रस तालुक्याचा निकाल ९१.३७ टक्के लागला. सर्वात कमी निकाल राळेगाव तालुक्याचा असून ७२.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचे सायबर कॅफेंवर गर्दी झाली होती.
शिकवणीशिवाय गार्गीचे यश, अंतराळ शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न
बारावीच्या परीक्षेत ९५.७० टक्के गुण घेऊन अव्वल ठरलेल्या गार्गीने कोणतीही शिकवणी लावली नव्हती. नियमित कॉलेज आणि दररोज चार तास अभ्यास हेच तिच्या यशाचे गमक आहे. शिकवणीशिवाय यश मिळूच शकत नाही, असा डांगोरा पिटणाऱ्यांच्या डोळ्यात गार्गीने झणझणीत अंजन घातले आहे. गार्गी ही उमरखेड येथील स्टेशनरी व्यावसायिक आनंद तेला यांची कन्या आणि गोपाल लक्ष्मीनारायण तेला यांची नात होय. तिला दहावीच्या परीक्षेतही ९७ टक्के गुण मिळाले होते. कुशाग्र बुद्धीच्या गार्गी तेला हिला अवकाश संशोधन शास्त्रात आपले करिअर करायचे असून अंतराळ शास्त्रज्ञ व्हायचे असल्याचे तिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. महाविद्यालयात प्राध्यापकांनी केलेले मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण अभ्यासातूनच आपण हे यश संपादित केल्याचे तिने सांगितले.
वाणिज्य शाखेत श्रावणी पाध्ये प्रथम
वाणिज्य शाखेत जिल्ह्यातून अव्वल येण्याचा मान उमरखेडने पटकाविला. येथील मॉर्डन पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी श्रावणी महेश पाध्ये हिने वाणिज्य शाखेत ९४.७७ टक्के गुण मिळविले आहे. या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर येथीलच यशस्वी मारोती सावळे ही ९१.५४ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने हे यश प्राप्त केले. तर यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलचा सुश्राव्य रंजन पातूरकर याने वाणिज्य शाखेत ९२.७६ टक्के गुण प्राप्त केले. त्याला सीए व्हायचे आहे.
जिल्ह्यातील ३२ शाळांचा निकाल १०० टक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील ३२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. शहरी शाळांसोबतच ग्रामीण भागातील शाळांनीही शंभर टक्के निकाल देऊन यश संपादित केले आहे.
शंभर टक्के निकाल देणाºया शाळा - अ‍ॅग्लो हिंदी कनिष्ठ महाविद्यालय, यवतमाळ (वाणिज्य), वसंतराव नाईक ज्युनिअर कॉलेज रूईवाई (वाणिज्य), रामजी चन्नावार कनिष्ठ महाविद्यालय, यवतमाळ (विज्ञान), संत शिरोमनी गोरोबा कनिष्ठ महाविद्यालय, लासीना (कला), वैष्णवी कला कनिष्ठ महाविद्यालय आश्रमशाळा (विज्ञान), नंदूरकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय यवतमाळ (विज्ञान), रामजी आदिवासी कनिष्ठ महाविद्यालय बाणगाव ता. नेर (विज्ञान), भीमजी घेरवरा कनिष्ठ महाविद्यालय, दारव्हा (कला), राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालय दिग्रस (विज्ञान), चव्हाण विजभज कनिष्ठ महाविद्यालय वडगाव ता. दिग्रस (विज्ञान), दामोधर पाटील कनिष्ठ महाविद्यालय दिग्रस (विज्ञान), उत्तमराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चिंचोली (विज्ञान), भारती कनिष्ठ महाविद्यालय आर्णी (विज्ञान व वाणिज्य), वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय सावळी सदोबा ता. आर्णी (विज्ञान), शहीद भगतसिंग कनिष्ठ महाविद्यालय आर्णी (विज्ञान), कोषटवार दौलतखान कनिष्ठ महाविद्यालय पुसद (विज्ञान), शिवाजी ज्युनिअर कॉलेज पुसद (विज्ञान), मुंगसाजी आदिवासी आश्रमशाळा माणिकडोह (विज्ञान), शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा हर्षी (विज्ञान), विश्वनाथसिंग बयास कनिष्ठ महाविद्यालय पुसद (विज्ञान), कस्तुरबा गांधी कनिष्ठ महाविद्यालय ढाणकी (विज्ञान), संत गाडगेबाबा कनिष्ठ महाविद्यालय ढाणकी (विज्ञान), स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय हरदडा (विज्ञान), सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय महागाव (विज्ञान), एचईएस कनिष्ठ महाविद्यालय हिवरा ता. महागाव (कला), मातोश्री घारफळकर कनिष्ठ महाविद्यालय बाभूळगाव (विज्ञान), डॉ. विराणी कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव (विज्ञान शाखा), जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय पांढरकवडा (विज्ञान), राजारावजी बोदगेवार कनिष्ठ महाविद्यालय पाटणबोरी (विज्ञान), प्रमिलाबाई राठोड आदिवासी आश्रमशाळा (विज्ञान), एसपीएम कनिष्ठ महाविद्यालय घाटंजी (विज्ञान), डॉ. शामाप्रसाद मुखर्जी कनिष्ठ महाविद्यालय घोटी ता. घाटंजी (वाणिज्य) यांचा समावेश आहे.

 

 

Web Title: Twelveth Umarkhed Gargi tops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.