सव्वा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्याचा शोध
By admin | Published: January 17, 2015 12:14 AM2015-01-17T00:14:30+5:302015-01-17T00:14:30+5:30
दुष्काळाची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा, असे आदेश धडकले. यासाठी २६ जानेवारी ही अखेरची तारीख देण्यात आली.
यवतमाळ : दुष्काळाची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा, असे आदेश धडकले. यासाठी २६ जानेवारी ही अखेरची तारीख देण्यात आली. मात्र मदतीस पात्र जिल्ह्यातील सुमारे एक लाख २५ हजार शेतकऱ्यांचे बँक खातेच नसल्याची बाब पुढे आली आहे. बारा दिवसात एवढे शेतकरी शोधण्याचे दिव्य प्रशासनाला पार पाडावे लागणार आहे.
आठ लाख २५ हजार हेक्टरातील पीक भुईसपाट झाले. चार लाख ५० हजार शेतकरी मदतीस पात्र ठरले. अशा शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी एकूण २९५ कोटी २९ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. पैकी १२२ कोटी ८० लाख रुपयांचा निधी जिल्ह्याला वळता करण्यात आला. प्राप्त झालेल्या निधीतून मदत २६ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश आहे. प्रत्यक्षात चार लाख ५० हजार शेतकऱ्यांपैकी तीन लाख २१ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्याची यादी जिल्हा प्रशासनाकडे आहे. एक लाख २९ हजार शेतकऱ्यांचे बँक खाते अजूनही गवसले नाही. असे असले तरी काही अनुभवी तहसीलदारांनी शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे हेरले होते. त्यावरून त्यांनी तलाठ्यांना ऐनवेळी गोंधळ नको म्हणून मदत जाहीर होण्यापूर्वीच शेतकऱ्यांचे बँक खाते, आधार कार्ड आणि छायाचित्र असलेले ओळखपत्र अशी माहिती गोळा करण्यास सांगितले होते. त्यावरून तलाठ्यांनी सुमारे महिनाभरापूर्वीच ही माहिती गोळा केली आहे. त्यामुळे काही ठिकाणी निम्म्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची व क्रमांकाची माहिती गोळा झाली आहे. त्या तहसीलदारांच्या आणि तलाठ्यांच्या सतर्कतेने शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत मिळण्यास उपयोग होणार आहे. (शहर वार्ताहर)
पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर चाप
मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. यासाठी तलाठ्यांनी याद्या तयार केल्या. यात गैरप्रकाराला वाव नसला तरी काही कर्मचाऱ्यांकडून तसा धाक दाखविला जाऊन पैशाची मागणी केली जात आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्याशी संपर्क केला असता, असा कुठलाही प्रकार होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. तक्रारी आल्यास कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.