बीएचआर मल्टिस्टेटने अडीच कोटींनी फसविले
By admin | Published: July 24, 2016 12:38 AM2016-07-24T00:38:35+5:302016-07-24T00:38:35+5:30
जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) को-आॅपरेटीव्ह मल्टिस्टेट पतसंस्थेने यवतमाळ जिल्ह्यातील ६२ गुंतवणुकदारांची दोन कोटी ५१ लाख ५४ हजार ७४१ रुपयांनी
तपास सीआयडीकडे : ६२ गुंतवणूकदार, २८ जणांविरुद्ध गुन्हा
यवतमाळ : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) को-आॅपरेटीव्ह मल्टिस्टेट पतसंस्थेने यवतमाळ जिल्ह्यातील ६२ गुंतवणुकदारांची दोन कोटी ५१ लाख ५४ हजार ७४१ रुपयांनी फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आला आहे.
जळगाव येथील बीएचआर मल्टिस्टेटने यवतमाळात शाखा उघडली. खान्देशातील नामांकित व प्रतिष्ठित पतसंस्था म्हणून नागरिक याकडे पाहात होते. दरम्यान, या पतसंस्थेने गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी ९० दिवसांकरिता १३ टक्के व्याज दराचे अमिष दाखविले. त्यामुळे प्रभावीत होवून अनेक गुंतवणूकदारांनी आपली रक्कम गुंतविली. परंतु ९० दिवस होवूनही ही रक्कम गुंतवणुकदारांना परत केली गेली नाही. वारंवार पतसंस्थेत येरझारा मारल्यानंतर ‘तारीख पे तारीख’ दिली गेली. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर प्रत्यक्षात पदरी निराशाच पडल्याने अखेर आर्णी तालुक्याच्या जवळा येथील ६७ वर्षीय जगदीश ब्रिजलाल जयस्वाल या गुंतवणुकदाराने पुढाकार घेत १० एप्रिल २०१५ रोजी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यानुसार तब्बल २८ जणांविरुद्ध भादंवि ४२०, ४०६, १२० ब, ३४ आणि महाराष्ट्र गुंतवणुकदार संरक्षण कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविला गेला.
या प्रकरणात आतापर्यंत ६२ गुंतवणुकदार ‘आमची फसवणूक झाली’ हे सांगण्यासाठी पुढे आले आहे. त्यांची फसवणुकीची रक्कम ही दोन कोटी ५१ लाख ५४ हजार ७४१ रुपये एवढी आहे. या गुंतवणुकदारांमध्ये जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठितांचा समावेश आहे. जिल्हा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण तपासाला देण्यात आले होते. परंतु या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता अखेर ते सीआयडीकडे सोपविण्यात आले आहे.
बीएचआरच्या या गुन्ह्यामध्ये संस्थापक प्रमोदकुमार भाईचंद राससोनी, उपाध्यक्ष दिलीप कांतिलाल चोरडिया, संचालक मोतीलाल ओंकार जिरी, सुरजमल बभूतमल जैन, दादा रामचंद्र पाटील, भागवत संपत माळी, राजाराम काशीनाथ कोळी, भगवान हिरामन वाघ, जितेंद्र यशवंत महाजन, इंद्रकुमार आत्माराम लालवाणी, शेख रमजान शेख अब्दुल नबी, ललिता राज सोनवने, प्रतिभा मोतीलाल जिरी, सुखलाल शहा बूबमाळी, कांचन प्रमोद रायसोनी, निशांत प्रमोद रायसोनी, स्रेहा रोहन साकेचा, रोशन राजेश साकेचा सर्व रा.तळेगाव ता.जामनेर जि.जळगाव हे प्रमुख आरोपी आहेत.
या शिवाय अमरावती येथील महिला प्रादेशिक व्यवस्थापक आणि यवतमाळच्या सल्लागार मंडळातील नऊ जणांचा आरोपी म्हणून समावेश आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून सीआयडीने बीएचआर फसवणूक प्रकरणाची संपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली असून तपास सुरू केला आहे. सीआयडीचे पोलीस अधीक्षक पठारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक एस.टी. खाटपे या गुन्ह्याचा तपास करीत आहे.
(जिल्हा प्रतिनिधी)
सीआयडीचे गुंतवणुकदारांना आवाहन
बीएचआर पतसंस्थेत कित्येक गुंतवणुकदारांची फसवणूक झाली आहे, त्याचा आकडाही बराच मोठा आहे. परंतु आतापर्यंत केवळ ६२ गुंतवणूकदार पुढे आले आहेत. फसवणूक झालेल्या अन्य गुंतवणुकदारांनीही पुढे येण्याचे आवाहन सीआयडीचे उपअधीक्षक एस.टी. खाटपे यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून केले आहे. अधिक माहितीसाठी सीआयडीचे पोलीस मुख्यालयस्थित कार्यालयाशी (दूरध्वनी क्र. ०७२३२-२४३३०६) संपर्क साधण्याबाबत सीआयडीने कळविले आहे.
आर्थिक गुन्ह्यांची पुण्यात झाली गर्दी
सीआयडीकडे येणाऱ्या अर्थविषयक गुन्ह्यांचा तपास सीआयडीच्या पुणे मुख्यालयातील आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग केला जातो. यापूर्वी आर्यरूप टुरिझममधील गुंतवणुकीचा तपास पुणे सीआयडीने केला. परंतु विविध जिल्ह्यातून आलेली शेकडो प्रकरणे पुण्यात गोळा झाल्याने आता अशा अर्थविषयक गुन्ह्यांचा तपास जिल्हास्तरावरच करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार बीएचआरचा तपास यवतमाळ सीआयडीकडूनच केला जाणार आहे. बीएचआर प्रकरणात अमरावती विभागात अनेक गुन्हे दाखल असल्याचे सीआयडीच्या सूत्रांनी सांगितले.