यवतमाळात अडीच लाखांचे बोगस खत जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:57 PM2020-06-20T12:57:19+5:302020-06-20T13:00:05+5:30
शनिवारी सकाळी दिग्रस तालुक्यातील तिवरी या गावात बावणे कृषी केंद्रात मालवाहू एसटीतून आलेला बोगस खताचा साठा उतरविला गेला. सापळा लावून असलेल्या कृषी अधिकाऱ्यांनी लगेच हा साठा जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कृषी विभागाने शनिवारी जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात अडीच लाख रुपयांचे बोगस खत जप्त केले. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे या बोगस खताचा कारखाना आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी एसटी आगाराच्या मालवाहू बसमधून हे खत सर्वदूर पोहोचविले जात असल्याची माहिती उघड झाली.
गेल्या काही दिवसांपासून मालवाहू एसटीद्वारे हे बोगस खत यवतमाळ शहर व जिल्ह्यात पोहोचविले जात होते. त्याची कुणकुण लागताच कृषी विभागाने सापळा रचला. त्यानुसार, शनिवारी सकाळी दिग्रस तालुक्यातील तिवरी या गावात बावणे कृषी केंद्रात मालवाहू एसटीतून आलेला बोगस खताचा साठा उतरविला गेला. सापळा लावून असलेल्या कृषी अधिकाऱ्यांनी लगेच हा साठा जप्त केला. डीएपीच्या नावावर शेतकऱ्यांच्या माथी मारले जाणारे बोगस खताच्या २०० बॅग जप्त करण्यात आल्या. वितरकाला ५०० ते ६०० रुपयात मिळणार ही बॅग शेतकऱ्याला १२०० रुपयात विकली जाते. या जप्त मालाची किंमत अडीच लाखांच्या आसपास सांगितली जाते. या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात वितरक व कारखाना मालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविला जाणार आहे.
एसटीने दररोज तीन फेऱ्या
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील बोगस खत कारखान्यातून माल पोहोचविण्यासाठी खास ब्रम्हपुरी आगाराच्या बस बुक केल्या जातात. दररोज मालवाहू तीन बसद्वारे हे खत यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर अशा विविध जिल्ह्यात पोहोचविले जाते. दारव्हा तालुक्यातील सोनोने नामक व्यक्ती दुकानांमध्ये हे खत पोहोचविण्याचे काम करते. कृषी विभागाने या युवकालाही ताब्यात घेण्यासाठी पथक पाठविले आहे.
कारखाना सील करणार
दिग्रस तालुक्यातील कारवाईची माहिती नागपूरच्या कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानुसार वडसा येथील बोगस खताचा हा कारखाना सील करण्याचे कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी पंकज बरडे, कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाचे अधिकारी दत्तात्रय आवारे, दिग्रसचे तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव, राहुल डाखोरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रमोद बागडे आदींनी ही कारवाई केली. कृषी विभागातील लिपिक प्रणव एंबडवार यांना डमी ग्राहक म्हणून पाठविले गेले होते. त्यामुळे त्यांच्याही या कारवाईत मोठी मदत झाली.
डीएपीच्या नावावर विकले जाणारे बोगस खत जप्त केले आहे. हे खत नसून केवळ राख असल्याचे कृषी विकास अधिकारी पंकज बरडे यांनी लोकमतला सांगितले.