यवतमाळात भरदिवसा अडीच लाखांची रोकड लुुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 20:57 IST2020-09-14T20:56:21+5:302020-09-14T20:57:48+5:30
दुकानातील दोन लाख ४० हजारांची रोकड घेऊन बँकेत भरण्यासाठी जात असलेल्या नोकराला यवतमाळातील माईंदे चौकात सोमवारी भरदिवसा दोन जणांनी लुटल्याची खळबळजनक घटना घडली.

यवतमाळात भरदिवसा अडीच लाखांची रोकड लुुटली
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: दुकानातील दोन लाख ४० हजारांची रोकड घेऊन बँकेत भरण्यासाठी जात असलेल्या नोकराला यवतमाळातील माईंदे चौकात सोमवारी भरदिवसा दोन जणांनी लुटल्याची खळबळजनक घटना घडली. सकाळी १०.३० वाजता घडलेल्या या घटनेने व्यापारी व व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे.
माईंदे चौकातील अभिनंदन प्लाझा येथे कन्झुमर एसव्हीआर हे दुकान आहे. तेथे विविध कंपन्यांच्या प्रॉडक्सचे मार्केटिंग केले जाते. दुकानातील व्यवस्थापक गोपाल पसारी याने दोन लाख ४० हजार रुपये असलेली बॅग नोकर आकाश श्यामराव कांबळे याच्या ताब्यात दिली. त्याला ही रक्कम एचडीएफसी बँकेत भरण्यास सांगितले. सोबत एक पार्सलही होते. आकाश व्यवस्थापकाची दुचाकी घेऊन बँकेत जाण्यासाठी निघाला. त्याला माईंदे चौक परिसरातील गुन्हाने मेडिकलजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडविले. आकाशची दुचाकी थांबवून लुटारूंनी गळ्यात अडकविलेली रोख रकमेची बॅग हिसकावून घेतली. काही कळण्याच्या आतच ते दोघेही स्प्लेन्डर दुचाकीवरून पसार झाले. आरडाओरडा केला असता रस्ता निर्जन असल्याने कुणीच धावून आले नाही. घाबरलेल्या आकाशने दुकानात जावून व्यवस्थापक गोपाल पसारी यांना हकीकत सांगितली. त्या घटनेची माहिती दुकान मालक कन्हैय्या वाधवाणी यांना देण्यात आली. मालकाने थेट अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून आकाश कांबळे याला तक्रार देण्यास सांगितले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि ३९२, ३४ कलमान्वये वाटमारीचा गुन्हा दाखल झाला आहे.
वाटमारीचा उलट तपास
या वाटमारीचा पोलीस उलट तपास करीत आहे. नेमकी गळ्यात अडकविलेल्या बॅगेतच रोख रक्कम आहे, हे लुटारूंना कसे कळले, त्यांनी पाठलाग करून निर्जनस्थळी हेरले या सर्व बाबींचा तपास केला जात आहे. सध्या फिर्यादीच संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे अवधूतवाडी पोलिसांनी सांगितले.