१५ लाखांच्या कर्जाचे आमिष देऊन फसविले, दिल्लीमधून दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 01:45 PM2021-12-22T13:45:04+5:302021-12-22T13:53:09+5:30

आरोपींच्या टोळीने कॅपिटल मुद्रा फायनान्स यांच्याकडून १५ लाखांचे कर्ज देतो, अशी बतावणी केली. व बेरोजगार असलेल्या विजय हरिश्चंद्र अटकारे या युवकाला जाळ्यात ओढले.

Two arrested from Delhi for swindling Rs 15 lakh | १५ लाखांच्या कर्जाचे आमिष देऊन फसविले, दिल्लीमधून दोघांना अटक

१५ लाखांच्या कर्जाचे आमिष देऊन फसविले, दिल्लीमधून दोघांना अटक

Next
ठळक मुद्देपाच राज्यांत ठगांचे नेटवर्कअवधूतवाडी पोलिसांची कारवाई

यवतमाळ : शहरातील सुशिक्षित बेरोजगाराला मुद्रा कॅपिटल फायनान्समधून कर्ज मंजूर केले जाते, अशी बतावणी करीत नोव्हेंबर महिन्यात ७५ हजार ५०२ रुपयांचा गंडा घातला.

या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पाच राज्यांत आरोपींचा शोध घेऊन या ठगांच्या टोळीतील दोघांना दिल्लीतून अटक केली. त्यांच्याकडून धक्कादायक माहिती हाती लागली आहे.

विजयकुमार रामचरण पाल (४५, रा. रमेशनगर, दिल्ली), विनोद जमुनाप्रसाद सोनी (३५, रा. छिंदवाडा, मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींच्या टोळीने कॅपिटल मुद्रा फायनान्स यांच्याकडून १५ लाखांचे कर्ज देतो, अशी बतावणी केली. बेरोजगार असलेल्या विजय हरिश्चंद्र अटकारे (रा. मंगलमूर्तीनगर, आर्णी रोड, यवतमाळ) या युवकाला जाळ्यात ओढले.

फोनवर बोलणाऱ्या रिया नामक महिलेने सांगितल्याप्रमाणे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याचे स्टेटमेंट हे दस्तावेज पडताळणीला पाठविले. नंतर १६ सप्टेंबरला कर्जाचा अग्रीम हप्ता ३८ हजार रुपये कॅनरा बँकेच्या खात्यात जमा करण्यास सांगितले. नंतर विमा काढण्यासाठी ३७ हजार ५०० रुपये जमा करण्यास सांगितले. अटकारे यांनी पूर्ण विश्वास ठेवून वेळोवेळी पैसे जमा केले. मात्र, नंतर गुंतवणूकदार मिळत नसल्याने कर्ज मिळणार नाही, असे सांगितले.

या गुन्ह्याचा तपास अवधूतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांनी सहायक निरीक्षक धीरेंद्रसिंग बिलवाल यांच्याकडे सोपविला. बिलवाल यांनी शिपाई सुधीर पिदूरकर याला सोबत घेऊन मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली अशा विविध ठिकाणी आरोपींचा शोध घेतला. या टोळीतील दोघे जण त्यांच्या हाती लागले. इतर साथीदार कुणकुण लागल्याने पसार झाले. या आरोपींकडून फसवणुकीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

आठ चेकबूक, सहा एटीएम जप्त

आरोपींनी अनेकांना गंडा घातला आहे. देशपातळीवर फसवणूक करणाऱ्यांची ही टोळी सक्रिय आहे. ग्राहकांकडून पैसे घेण्यासाठी या आरोपींनी झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश येथील विविध बँकांमध्ये खाते उघडले आहे. त्या खात्यांत पैसे जमा केले जातात. नंतर तेथून पैसे काढून घेतात. अटक केलेल्या आरोपींकडून आठ चेकबूक, सहा एटीएम कार्ड व कर्ज मिळविण्यासाठी अनेकांनी त्यांच्याकडे दिलेले आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबूक अशी महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. आरोपींकडून ५२ हजार ७०० रुपयांची रोख रक्कमही अवधूतवाडी पोलिसांनी हस्तगत केली आहे.

Web Title: Two arrested from Delhi for swindling Rs 15 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.