महिला सहकारी बँकेतील शाखा व्यवस्थापकासह दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 05:43 PM2024-10-26T17:43:00+5:302024-10-26T17:43:42+5:30
Yavatmal : २०६ पैकी आतापर्यंत १२ आरोपींवर अटकेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत संचालक मंडळ, व्यवस्थापक, कर्मचारी, मूल्यांकनकार लेखा परीक्षक या सर्वांनी संगनमत करीत २४२ कोटींचा अपहार केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्याचा तपास विशेष पथकाकडून केला जात आहे. २०६ आरोपींपैकी आतापर्यंत या पथकाने १२ जणांना अटक केली. शुक्रवारी दुपारी दोन वाजता एक कर्जदार आणि शाखा व्यवस्थापक महिला या दोघांना ताब्यात घेतले.
गजानन सीताराम कोकाडे (रा. वैभवनगर वाघापूर), तत्कालीन शाखा व्यवस्थापक पौर्णिमा गिरीष गिरडकर (रा. शिव अपार्टमेंट उमरसरा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना एसआयटीने शुक्रवारी दुपारी राहत्या घरून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करीत पोलिस कोठडी मागण्यात आली.
न्यायालयाने या दोन्ही आरोपींना २८ ऑक्टोबरपर्यंत पीसीआर दिला आहे, तर यापूर्वी एसआयटीने आशिष गेडाम (रा. श्रीकृष्ण नगर दारव्हा रोड), राजू मस्की (रा. मारेगाव) या दोन थकीत कर्जदारांना अटक केली होती. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
विशेष तपास पथकाचे प्रमुख रजनीकांत चुलुमुला यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक सागर दानडे, जमादार मिलिंद गोफणे, सूरज शिंदे, सचिन पिंपळकर, अपर्णा जाधव, दीपाली माकोडे, चालक रविकांत नांदेकर यांनी ही कारवाई केली. अधिक तपास सुरू आहे.
दिवाळीत एसआयटीचे अटकसत्र
बाबाजी दाते महिला सहकारी बँक अपहार प्रकरणात अनेक दिग्गजांवर आरोप ठेवण्यात आले आहे. अजूनपर्यंत अशा मोठ्या आरोपीला एसआ- यटीने अटक केलेली नाही. आता दिवाळीच्या सणाची संधी साधत एसआयटी सक्रिय झाली आहे. आरोपींचा माग काढून अटकसत्र राबविले जात आहे. दोन आठवड्यांत चार आरोपींना एसआयटीने अटक केली आहे. या अटकसत्रामुळे आरोपी पुन्हा एकदा भूमिगत झाले आहेत.