दोन अस्वलांचा विहिरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 06:29 PM2020-01-16T18:29:37+5:302020-01-16T18:29:44+5:30
शेतातील विहिरीमध्ये दोन नर जातीचे अस्वल मृतावस्थेत आढळले.
यवतमाळ: महागाव तालुक्यातील कोठारी शिवारातील विहिरीमध्ये पडून दोन अस्वलांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान निदर्शनास आली.
कोठारी शिवारातील शिवा संभा आढागळे यांच्या शेतातील विहिरीमध्ये दोन नर जातीचे अस्वल मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती कोठारीचे पोलीस पाटील किसन नांदे यांनी वन विभागाला दिली. उपविभागीय वनअधिकारी अमोल थोरात व वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत उबाळे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विहिरीत खाट सोडून दोन्ही अस्वलांचे मृतदेह बाहेर काढले. घटनेचा पंचनामा केला. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.येवतीकर व डॉ.वाय.एस. पाटील यांना पाचारण करून अस्वलांच्या मृतदेहाची उत्तरिय तपासणी करण्यात आला.
दोन्ही अस्वलांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केला. सदर विहीर जमीन लेव्हलला आहे. तसेच सभोवताल गवत वाढले आहे. त्यामुळे दोन्ही अस्वल विहिरीत पडल्याचा कयास वर्तविला जात आहे. उत्तरिय तपासणीनंतर दोन्ही अस्वलांचे डॉक्टर व वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांसमक्ष दहन करण्यात आले.
घटनास्थळी कोणत्याही प्रकारे वीज प्रवाह किंवा विषाचा प्रयोग झाल्याचे आढळले नाही. मात्र खरे कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळणार आहे. दरम्यान, यवतमाळ येथील मानव वन्यजीव कोबरा अॅडव्हेंचरची चमूसुद्धा आली होती. वन विभागाचे बी. ए. खान, क्षेत्र सहायक एस.एम. हक, एस.एम. राठोड, डी.व्ही. गावंडे, वनपाल व इतर वनकर्मचाºयांसह नागरिकांनी अस्वलांचे मृतदेह बाहेर काढण्यास सहकार्य केले. घटनास्थळाला उमरखेड उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी भेट दिली.