जिल्हा परिषदेचे दोन सभापती अखेर पायउतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 10:17 PM2019-05-03T22:17:10+5:302019-05-03T22:17:39+5:30
जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ समिती सभापती निमीष मानकर आणि शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनीताई दरणे यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाल्याने हे दोघेही शुक्रवारी पायउतार झाले. दरम्यान अविश्वास दाखल झालेल्या तिसऱ्या महिला व बालकल्याण सभापती अरुणा खंडाळकर यांना मात्र राजकीय जीवदान मिळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ समिती सभापती निमीष मानकर आणि शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनीताई दरणे यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाल्याने हे दोघेही शुक्रवारी पायउतार झाले. दरम्यान अविश्वास दाखल झालेल्या तिसऱ्या महिला व बालकल्याण सभापती अरुणा खंडाळकर यांना मात्र राजकीय जीवदान मिळाले आहे.
जिल्हा परिषदेत दोन वर्षापूर्वी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित येत सर्वात मोठ्या असलेल्या शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवत सत्ता स्थापन केली होती. गेल्या दोन वर्षात सत्ताधाऱ्यांमध्येच बेबनाव निर्माण झाल्याचे चित्र होते. यातूनच प्रथम राष्ट्रवादीचे गटनेते असलेले निमीष मानकर यांचे गटनेते पद काढून बाळा कामारकर यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेत सत्ताधाºयांमध्ये बेबनाव निर्माण झाला.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्तरावर भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादीची युती आणि आघाडी झाली. नंतर जिल्हा परिषदेतील राजकारणाने कलाटणी घेतली. त्यातून भाजप-शिवसेना युतीच्या ३८ सदस्यांनी तीन सभापतींविरुद्ध अविश्वास दाखल केला. बांधकाम सभापती निमीष मानकर यांच्याविरुद्ध ५९ विरुद्ध ० मतांनी ठराव पारित झाला. यातून ६१ पैकी मानकर वगळता सर्वच सदस्य त्यांच्या विरोधात असल्याचे स्पष्ट झाले. अपक्ष व आता काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या सभापती नंदिनी दरणे यांच्यावर ४७ सदस्यांनी अविश्वास दर्शविला. त्यामुळे त्यासुद्धा पायउतार झाल्या. यात शिवसेनेचे २०, भाजपचे १८, राष्ट्रवादीचे नऊ सदस्य सहभागी होते. महिला व बालकल्याण सभापती अरुणा खंडाळकर यांच्याविरुद्ध मात्र अविश्वास ठराव पारित होऊ शकला नाही. मतदानापूर्वीच काँग्रेसच्या ११ सदस्यांनी बहिर्गमन केले. यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या ४९ सदस्यांपैकी ठरावाच्या बाजूने केवळ २२ मते पडली. यात शिवसेनेचे २० आणि राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांची मते होती. विशेष म्हणजे भाजपचे १८ आणि राष्ट्रवादीचे मानकर यांच्यासह नऊ सदस्य तटस्थ होते. परिणामी खंडाळकर यांना राजकीय जीवदान मिळाले.
झेडपीत विरोधकच नाही
आतापर्यंत भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता होती. आता मानकर यांच्याविरोधात सर्वच पक्ष एक झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेत विरोधकच उरला नाही. विशेष म्हणजे काँग्रेसच्या दहा सदस्यांनीही मानकर यांच्याविरोधात मतदान केले. काँग्रेसच्या एका सदस्याने नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगितले. अध्यक्षाला वाचविण्यासाठी नेत्यांनी दबाव टाकल्याचे यातून स्पष्ट झाले. विशेष म्हणजे खंडाळकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव पारित झाला असता तर नैतिकतेच्या दृष्टीने अध्यक्ष माधुरी आडे यांना राजीनामा देणे भाग पडले असते. त्यामुळे खंडाळकर व आडे यांच्यासाठी काँग्रेसने चक्क शिवसेना, भाजप सोबत हात मिळवणी केल्याचे स्पष्ट झाले.
राष्ट्रवादीत सावळा गोंधळ
अविश्वास ठरावावरील चर्चेला ६१ पैकी ६० सदस्य उपस्थित होते. काँग्रेसच्या जया पोटे वैयक्तिक कारणामुळे अनुपस्थित होत्या. खंडाळकर यांच्यावरील अविश्वासाच्या वेळेस शिवसेनेच्या २० सदस्यांसह राष्ट्रवादीचे भोलेनाथ कांबळे आणि गजानन उघडे यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे भाजपने युतीधर्म पाळला नसल्याचे दिसून आले. शिक्षण सभापती नंदिनी दरणे यांच्यावरील अविश्वास ठरावावरही ४७ मते पडली. त्यात शिवसेनेचे २०, भाजपचे १८ आणि राकाँची नऊ मते होती. यातही राकाँच्या विमल आडे यांनी ठरावाला विरोध केला.