गुणरत्न सदावर्ते यांच्या ताफ्यातील वाहनाच्या धडकेत दोन बालक गंभीर; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 10:14 AM2022-12-20T10:14:34+5:302022-12-20T10:17:07+5:30
जखमींना सोडून ताफा गेला पुढे, नागरिकांमध्ये संताप
पुसद (यवतमाळ) : स्थानिक बसस्थानकासमोरील कारला रोडवर जिनिंग प्रेसिंगसमोर रविवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास पायदळ जाणाऱ्या दोन बालकांना ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या ताफ्यातील वाहनाने धडक दिली. यात दोन बालक गंभीर जखमी झाले.
वाहन (क्र. एमएच ०१ इडी १००) चालकाने भरधाव वाहन चालवून बालकांना धडक दिली. धडकेत दोन्ही बालके गंभीर जखमी झाली. त्यात एकाचा पाय फ्रॅक्चर झाला. मात्र जखमींना सोडून ताफा पुढील प्रवासासाठी निघून गेला. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला. गुणरत्न सदावर्ते एसटी कामगारांची संघटना बांधणीसाठी येथे आले होते. गंभीर जखमींना जमलेल्यांनी येथील डॉ. पंकज बासटवार यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती केले.
या अपघातात अथर्व लक्ष्मण खैरे (वय १४) आणि शिवा हनुमान सोळंके (१८) जखमी झाले. याप्रकरणी लक्ष्मण विद्याधर खैरे यांनी तक्रार दिल्यावरून वसंतनगर पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.