दोन कोटींचा रस्ता तीन दिवसात फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 09:50 PM2019-06-01T21:50:59+5:302019-06-01T21:51:28+5:30
डांबरीकरण झालेला रस्ता केवळ तिसऱ्या दिवशी उखडावा, यावरून झालेल्या कामाचा दर्जा कसा असावा हे स्पष्ट होते. पिंपळगाव-कोलुरा रस्त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्चून हा रस्ता तयार करण्यात आला. गुळगुळीत झालेल्या रस्त्यावरून मार्ग काढताना होणारा आनंद औटघटकेचा ठरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : डांबरीकरण झालेला रस्ता केवळ तिसऱ्या दिवशी उखडावा, यावरून झालेल्या कामाचा दर्जा कसा असावा हे स्पष्ट होते. पिंपळगाव-कोलुरा रस्त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्चून हा रस्ता तयार करण्यात आला. गुळगुळीत झालेल्या रस्त्यावरून मार्ग काढताना होणारा आनंद औटघटकेचा ठरला. संपूर्ण रस्ता उखडायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून एका कंत्राटदाराने या रस्त्याचे काम केले. त्याने आपले संपूर्ण ‘कौशल्य’ या कामात ओतले. अतिशय बोगस साहित्य या कामासाठी वापरले असावे हे सांगण्यासाठी कुण्या भविष्यवेत्त्याची गरज नाही. पुसदच्या कंत्राटदाराने सिमेंट रस्ता पूर्ण केला. डांबरीकरणाचे काम केले नाही. यवतमाळ येथील एका कंत्राटदाराने औदार्य दाखवित काम पूर्ण केले. परंतु त्यात प्रामाणिकतेचा थोडाही लवलेश नाही. पाच-पन्नास मिटर नव्हे तर तब्बल २०० मीटर डांबरीकरण उखडले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता तूषार परळीकर यांना याविषयी विचारले तर त्यांनी मुख्य अभियंत्यांना विचारा असे सांगून जबाबदारी झटकली.
अवघ्या तिसºया दिवशी डांबरीकरण उखडले, ही बाब गंभीर आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र हा विषय गांभीर्याने घेत नाही. जबाबदारी एकमेकांवर ढकलली जाते. या कामाच्या चौकशीसाठी ग्रामपंचायतीतर्फे तक्रार केली जाईल, असे पिंपळगाव(डुब्बा)चे सरपंच झुंबरसिंग चव्हाण यांनी सांगितली.
काम सुरू असताना लक्ष द्यायचे नाही, ही अधिकाऱ्यांच्या कामाची पद्धत झाली आहे. लोकांनी तक्रारी केल्यानंतर आश्वासने द्यायची. असाच प्रकार पिंपळगाव-कोलुरा रस्त्याबाबत झाला आहे. अभियंता एस.डी. माही यांनी सदर रस्त्याचे सीलकोट करून दिले जाईल, असे सांगून कंत्राटदारांची पाठराखण केली.