लग्नासाठी आलेल्या दोघांना ट्रकने चिरडले; संतप्त जमावाकडून वाहनाची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 01:54 PM2023-05-12T13:54:49+5:302023-05-12T13:56:39+5:30
चिखलगाव परिसरातील मेघदूत कॉलनीतील रहिवासी महादेव कांबळे यांच्या मुलाचा गुरूवारी विवाह पार पडला.
वणी (यवतमाळ) : लगतच्या चिखलगाव परिसरातील मेघदूत कॉलनीत लग्न समारंभासाठी आलेल्या दोघांना यवतमाळ मार्गावरील लालपुलियावर भरधाव ट्रकने चिरडले. यात दोघांचाही जागीच करूण अंत झाला. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता घडलेल्या या घटनेनंतर घटनास्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने अपघात करणाऱ्या ट्रकच्या काचा फोडून आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. स्वप्नील माणिक तांदूळकर (२५) रा.खैरगाव (ऊर्जानगर, जि.चंद्रपूर) व जीवन अनंत कांबळे (१५) रा.लहुजीनगर पडोळी (जि.चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत.
चिखलगाव परिसरातील मेघदूत कॉलनीतील रहिवासी महादेव कांबळे यांच्या मुलाचा गुरूवारी विवाह पार पडला. या विवाह समारंभासाठी स्वप्नील व जीवन हे आपल्या कुटुंबासह कांबळे यांच्याकडे आले होते. शुक्रवारी सकाळी हे दोघे एम.एच.२९-ए.एच.८३९१ क्रमांकाच्या दुचाकीने नास्त्याच्या प्लेटा व चहाचे कप घेण्यासाठी वणीकडे आले होते. साहित्य विकत घेऊन ते परत मेघदूत कॉलनीकडे जात असताना लालपुलिया परिसरात एका उभ्या ट्रकचा पल्ला दुचाकीला लागल्याने हे दोघेही खाली पडले. याचवेळी मागून येणाऱ्या एम.एच.३४-बी.जी.१९८३ क्रमांकाच्या ट्रकने या दोघांनाही चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळाच्या २५ मीटर अंतरापर्यंत रक्ताचा सडा पसरला होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच संतप्त नातलगांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
या घटनेमुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करून ट्रकच्या काचा फोडल्या. बराचवेळ वाहतूक रोखून धरण्यात आली होती. त्यामुळे वणी-यवतमाळ मार्गावर दोनही बाजुने ट्रकच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, वणीचे एसडीपीओ संजय पुज्जलवार, ठाणेदार प्रदीप सिरस्कर, सहाय्यक पोलीस निरीक्षक माया चाटसे व पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. यावेळी पोलिसांनी नातलगांची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वणीच्या ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातानंतर फरार झालेल्या ट्रकचालकाचा वणी पोलिस शोध घेत आहेत.