दोन दिवसांपासून रिमझीम पाऊस
By admin | Published: July 22, 2014 12:05 AM2014-07-22T00:05:47+5:302014-07-22T00:05:47+5:30
पुसद तालुक्यात शनिवार व रविवार या दोन दिवसात रिमझीम पाऊस सुरू असून ११ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत केवळ ५४ मिमी. पावसाची नोंद असून
पुसद : पुसद तालुक्यात शनिवार व रविवार या दोन दिवसात रिमझीम पाऊस सुरू असून ११ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत केवळ ५४ मिमी. पावसाची नोंद असून यंदा मागील १० वर्षातील सरासरीपेक्षा सर्वात कमी पाऊस कोसळला आहे. मागील वर्षी २१ जुलैपर्यंत तब्बल ४०० मिमी पाऊस कोसळला होता. तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट कायम असून अद्यापही दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हवामान खात्याचे अंदाज चुकवून पाऊस गायब झाला. रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू आदी पावसाची नक्षत्रे कोरडी गेल्याने यंदा बळीराजा हवालदिल झाला. त्यातच १४ जून व ८ जुलै रोजी तालुक्यात पाऊस कोसळला. आता पाऊस येईलच या भाबड्या आशेने काही शेतकऱ्यांनी उडीद, मूग व सोयाबीनची पेरणी केली. मात्र पेरलेले ५० टक्के बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. तर उडीद, मुगाचा हंगाम निघून गेल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन व कपाशीची मोठ्या हिमतीने पेरणी केली. मात्र पुन्हा पावसाने दडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली होती. मात्र आता १९ व २० जुलै या दोन दिवसांपासून तालुक्यात सार्वत्रिक रिमझीम पाऊस बरसत आहे. सगळीकडे ढगाळ वातावरण पसरले असून वातावरणात गारवा वाढला आहे. १९ जुलै रोजी सात तर २० जुलै रोजी चार मिमी असे एकूण ११ मिमी पावसाची नोंद तहसील कार्यालयाने केली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत केवळ ५४ मिमी पाऊस कोसळला असून मागील वर्षी २१ जुलैपर्यंत तब्बल ४०० मिमी पाऊस कोसळला होता, हे विशेष. यंदा सरासरीपेक्षा केवळ ५४ मिमी पाऊस कोसळण्याची ही मागील १० वर्षातील पहिलीच वेळ असल्याचे जाणकारांचे मत आहे. (प्रतिनिधी)